संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी येथील समाधी मंदिराच्या कळसास सुवर्ण झळाळी देण्यात आली आहे. हरिनामाच्या गजरात व वेदमंत्रांच्या घोषामध्ये मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. त्यामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली आहे.
माऊलींच्या मंदिराच्या मूळ रचनेत बदल न करता मंदिराचे नूतनीकरण, जिर्णोद्धार करण्याचे काम सध्या संस्थान कमिटीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी या अंतर्गत मुक्ताई मंदिर, सिद्धेश्वर महाराज मंदिर कळसाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर माऊलींच्या मंदिराच्या कळसाचे मजबुतीकरण व नूतनीकरण करण्यात आले. मंदिराच्या कळसाला सुवर्ण झळाळी देण्यात आली.
कळसाची पूजा विश्वस्त प्रशांत सुरू यांच्या हस्ते करण्यात आली. प्रमुख विश्वस्त श्यामसुंदर मुळे, विश्वस्त डॉ. शिवाजी मोहिते, माजी विश्वस्त सुधीर िपपळे, माजी नगराध्यक्ष दत्तोबा कुऱ्हाडे तसेच राजाभाऊ चोपदार, व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, राहुल काळे, रामभाऊ मोरे, माऊली वीर, भजन सम्राट कल्याण गायकवाड आदी त्या वेळी उपस्थित होते.