News Flash

‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाची अमृतमहोत्सवपूर्ती

१८ मे १९४० रोजी प्रदर्शित झालेल्या संत ज्ञानेश्वर चित्रपटाला सोमवारी (१८ मे) ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.

| May 17, 2015 03:15 am

‘प्रभात फिल्म कंपनी’च्या कारकिर्दीतील सुवर्णझळाळी असलेला.. समाधी घेताना चेहऱ्यावर सात्विक भाव दिसावेत यासाठी तीन दिवस उपवास करणाऱ्या शाहू मोडक यांची अजरामर भूमिका.. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषात चित्रपटगृहावर आणण्यात आलेली रिळं (प्रिंट).. पुणे आणि मुंबई य़ेथे एकाच दिवशी प्रदर्शित होऊन ३६ आठवडे हाऊसफुल्ल चाललेल्या ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटाची अमृतमहोत्सवपूर्ती झाली आहे. १८ मे १९४० रोजी प्रदर्शित झालेल्या संत ज्ञानेश्वर चित्रपटाला सोमवारी (१८ मे) ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाने ७५ वर्षांपूर्वी ४ लाख ६७ हजार रुपयांची कमाई केली होती.
‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटानेच ७ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनवरील मराठी चित्रपटांच्या प्रक्षेपणाचा शुभारंभ झाला होता. अमेरिकेमध्ये व्यावसायिकरीत्या प्रदर्शित होण्याचा बहुमानही तांत्रिकदृष्टय़ा सर्वोत्तम असलेल्या ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटानेच पटकाविला होता. ‘ज्ञानदेव लाईट ऑफ एशिया’ या नावाने हा चित्रपट अमेरिकेमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी ‘सिनेमॅटोग्राफ’ या सिनेनियतकालिकामध्ये या चित्रपटाची प्रशंसा करणारा खास लेख लिहिला होता, या आठवणींना ‘प्रभात’च्या अनिल दामले यांनी उजाळा दिला. ७५ वर्षांनंतरही ‘संत तुकाराम’ या चित्रपटाप्रमाणेच ‘संत ज्ञानेश्वर’ या बोलपटाच्या डीव्हीडींची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभात फिल्म कंपनीचे १९३२ मध्ये पुणे येथील विस्तारित जागेमध्ये स्थलांतर झाले. १९३६ मध्ये दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेला ‘संत तुकाराम’ चित्रपट गाजला. १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोपाळकृष्ण’ चित्रपटाला अमाप यश मिळाले आणि संस्थेला पैसा-प्रसिद्धी मिळाली. पुढचा चित्रपटही संतपट काढायचा असे दामले यांनी ठरविले. दुसऱ्या महायुद्धात होरपळून निघालेल्या जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या चित्रपटाची निर्मिती ही कालानुरुप वाटली आणि त्यातूनच ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाची कथा आकार घेऊ लागली. यशवंत निकम या बालकलाकाराने छोटय़ा ज्ञानेश्वरांची तर, त्यांच्या भावंडांनी ज्ञानेश्वरांच्या भावंडांची भूमिका केली होती. चांगदेवांची भूमिका करणारे गणपतराव तांबट खरोखरीच्या वाघावर स्वार झाले होते, असेही अनिल दामले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 3:15 am

Web Title: sant dnyaneshwar completes 75 years
Next Stories
1 भाडेतत्त्वावरील बसऐवजी एसटीकडूनच ‘शिवनेरी’ची खरेदी
2 गोवंश हत्या बंदीला रिपब्लिकन पक्षाचा विरोध
3 महाविद्यालयातील रॅगिंगला प्राचार्य जबाबदार
Just Now!
X