वारकऱ्यांसाठी सुविधांसोबतच मार्गातील अतिक्रमणे हटवणार

आळंदी व देहू येथे पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्याबरोबरच पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ काढावीत तसेच रस्ते दुरुस्तीबरोबरच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी पालखी सोहळा नियोजनाच्या बैठकीत दिले.

राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीस ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विशेष शाखा उपायुक्त श्रीकांत पाठक, पालखी सोहळा विविध समित्यांचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावरील कमानींची उंची वाढविणे, पालखी मार्गावरील अतिक्रमणे तत्काळ हटवली जावीत, त्यासाठी महसूल, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त मोहीम राबवावी. पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, जेथे आवश्यक आहे तेथे रस्त्यांची दुरुस्ती करावी, रस्त्यांच्या साइड पट्टय़ांचे काम देखील करून घ्यावे जेणेकरून वारकऱ्यांना चालताना त्रास होणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

पालखी मार्गावर, विसाव्याच्या ठिकाणी आणि पालखीच्या तळावर स्वच्छता राखली जाईल याची काळजी महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. त्यासाठी आवश्यकता भासल्यास िदडी समित्यांशी संपर्क साधावा. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल आणि अन्न पदार्थाच्या विक्रीच्या स्टॉलची पाहणी अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे केली जावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नियंत्रित कि मतीमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर संबंधित यंत्रणेमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनातर्फे पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पालखी सोहळ्याच्या पोलीस बंदोबस्ताबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन पोलीस दलाला त्याबाबतच्या सूचना केल्या.