‘भक्ती शक्ती’च्या धर्तीवर आळंदीलगत संतसृष्टीचा उपक्रम

पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज यांची भावंडांसह संत नामदेव महाराज यांच्यासमवेत झालेल्या भेटीवर आधारित २५ शिल्पांचा समावेश असलेले भव्य शिल्पसमूह श्री क्षेत्र आळंदीलगत चऱ्होलीत उभारण्यात येत आहे. पिंपरी महापालिकेने मोठा गाजावाजा करत सुरू केलेला आणि जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला शिल्पसमूह प्रकल्प यंदाच्या पालखी प्रस्थानापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या निगडित छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित भक्ती-शक्ती शिल्पसमूह उभारले आहे. त्याच धर्तीवर  चऱ्होलीत ‘संतसृष्टी’ प्रकल्प उभारण्यात येत आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या संतसृष्टीतील पहिल्या टप्प्यात शिल्पसमूह तर दुसऱ्या टप्प्यात ५७ भित्तिशिल्प उभारण्यात येणार आहे. बारा वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. सुरुवातीला प्रकल्प खर्च दोन कोटी रुपये होता. आता एकूणातील आकडा २९ कोटींच्या घरात आहे.

थोरल्या पादुका मंदिरालगतच्या मैदानात साडेतीन एकर जागेत हा प्रकल्प होणार आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांच्यासह इतर २० वारकरी शिल्पांचा समावेश समूहशिल्पात आहे. आतापर्यंत २३ शिल्प बसवून झाली आहेत. संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांची शिल्पे बसवण्याचे काम राहिले आहे. ते लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या प्रकल्पाच्या ठिकाणी ६५० बैठक व्यवस्था असलेले स्वतंत्र खुले सभागृह आहे.

उशिराची कारणे

सुरुवातीपासून रडतखडत वाटचाल होत असलेल्या या प्रकल्पाला करोनामुळे उशीर झाल्याची सबब महापालिकेकडून पुढे करण्यात आली. याशिवाय, आवश्यक परवानग्या वेळत मिळू शकल्या नाहीत. आराखडय़ात बदल होत राहिले. प्रकल्पाचे क्षेत्र वाढले. शिल्पकाराकडून उशीर झाला, अशी इतर कारणेही सांगण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानास्पद ठरेल, असा हा प्रकल्प आहे. शिल्पसमूहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालखी प्रस्थानापूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्पाच्या कामाची व्याप्ती वाढल्याने खर्चही वाढला. करोनामुळे कामाला उशीर झाला.

– संजय घुबे, कार्यकारी अभियंता, पिंपरी पालिका