संतोष माने हा त्याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत जाणीवर्पूवक न्यायालयासमोर बाजू सांगत नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाशीध व्ही. के. शेवाळे यांनी सुनावणीच्या वेळी नमूद केले. मानेला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात जबाब घेण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले.
स्वारगेट एसटी स्थानकातून बस चोरून भरधाव चालवत नऊ जणांचा बळी घेतल्याप्रकरणी संतोष मानेला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. माने याने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शिक्षेवर म्हणणे मांडण्यास सत्र न्यायालयात वेळ दिला नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅड. धनंजय माने यांनी केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने मानेची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचा जबाब घेण्यासाठी हा खटला परत सत्र न्यायालयाकडे पाठविला होता. सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होताच अॅड. धनंजय माने यांनी संतोष माने हा जबाब देण्यासाठी मानसिकदृष्टय़ा सक्षम आहे का, याची तपासणी करावी आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदवा, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने येरवडा मनोरुग्णालयास मानेची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. येरवडा मनोरुग्णालयाच्या तीन डॉक्टरांच्या पॅनलने मानेची तपासणी करून तो मानसिक रुग्ण नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर संतोष मानेचा जबाब नोंदविण्यास न्यायालयाने सुरुवात केली.
संतोष मानेला न्यायालयाने बुधवारी काही प्रश्न विचारले. शिक्षेसंदर्भात काही बाजू मांडायची आहे का, बचावासाठी काही पुरावे न्यायालयासमोर द्यायचे आहेत का असे काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, मानेने त्या प्रश्नाला उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर न्यायालयाने अॅड. धनंजय माने यास शिक्षेसंदर्भात काही म्हणणे सादर करायचे आहे, अशी विचारणा केली. त्या वेळी अॅड. माने यांनी आरोपीला काही समजत नसल्याचे नमूद करत शिक्षेसंदर्भात सांगण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली. त्यानुसार या खटल्याची पुढील सुनावणी आता ३० नोव्हेंबर रोजी होणार आहे.