‘‘मी जेव्हा एचआयव्हीबाधित मुलांसाठी काम करू लागलो तेव्हा आई-वडिलांनी घरातून हुसकून दिले, समाजाने वाळीत टाकले. लोक विचारू लागले, ‘तुलाही एचआयव्ही आहे की काय?’ मी देखील त्यांना सांगितले की, तुम्हाला वाटत असेल तर मला एचआयव्ही आहे, तुम्हाला वाटत नसेल तर नाही. कुणी काहीही विचार करो, मी माझे काम करतच राहणार!’’
..एचआयव्हीबाधित बालकांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी झटणारे ट्रकचालक संतोष पवार बोलत होते. ‘द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशन’ या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘शतायुषी ग्रामीण आरोग्य सेवा पुरस्कार’ माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पवार यांना रविवारी प्रदान करण्यात आला. संस्थेचा ‘आरोग्य शिक्षण पुरस्कार’ स्वमग्न बालकांसाठी काम करणाऱ्या ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’च्या पद्मजा गोडबोले यांना, तर ‘आरोग्य सेवा पुरस्कार’ ४५० बालमधुमेहींना मोफत उपचार पुरवणाऱ्या डॉ. अभय मुथा यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे डॉ. अरविंद संगमनेरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर या वेळी उपस्थित होते.
 पवार या वेळी आपल्या मनोगतात म्हणाले, ‘‘एचआयव्हीबाधित बालकांकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. या बालकांना शाळेत घ्यायला कुणी तयार नसे. बाह्य़रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर परिणाम होईल असे सांगून डॉक्टर या मुलांना उपचार नाकारत. मला माझ्या कामासाठी कोणतेही अनुदान नको आहे. दर दिवाळीला संस्थेतील मुलांना कोणत्या वस्तू लागतात याची मी यादी करतो आणि त्या वस्तूच नागरिकांकडे मागतो.’’
प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘‘डॉक्टरी पेशा हा सेवेचा पेशा असून त्यातील ‘कट प्रॅक्टिस’सारख्या मुद्दय़ांवर आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, गरीब वस्त्यांमध्ये दृष्टीस पडणारे कुपोषण आणि लहान वयातील व्यसनाधीनता यासंबंधी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे.’’
‘बुवा-बाबांकडे जाऊन उपचार घेणे, शस्त्रक्रियेसाठी मुहूर्त काढणे अशा वैद्यकीय अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,’ असे डॉ. संगमनेरकर यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर ‘शाळकरी मुलामुलींचे आजार- आरोग्य आणि अभ्यास’ या विषयावर डॉ. कोल्हटकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.