शिक्षकांसाठी ‘सरल’ पुन्हा एकदा कठीण ठरले आहे. सरलची माहिती भरण्यासाठी अवघे दोनच दिवस राहिलेले असतानाही अनेक शाळांमध्ये पुरेशी माहितीच गोळा झालेली नाही. त्यातच सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षक हैराण झाले आहे.
राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांची माहिती एकाच पटलावर नोंदवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘सरल’ ही प्रणाली सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबरोबरच इतर शिक्षक, शाळेतील सुविधा अशा विविध गोष्टींची नोंद करायची आहे. वेगवेगळ्या ३० हून अधिक मुद्दय़ांची माहिती शिक्षकांनी या प्रणालीत भरायची आहे. ही माहिती भरण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या प्रणालीत माहिती भरण्यासाठी १५ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अद्यापही अनेक शाळांमध्ये ही माहिती भरून झालेलीच नाही. विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी अडचणी येत असल्याचेही शिक्षक सांगत आहेत. अनेक तपशील देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे ही माहिती भरताना शिक्षक हवालदिल झाले आहेत. दोनच दिवस मुदत राहिलेली असल्यामुळे आता शाळांमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. ‘इतर कामे आणि त्यातच अभ्यासक्रमही पूर्ण करणे आवश्यक आहे. शाळेतील शिक्षकांची संख्या मुळातच मर्यादित आहे. सरलच्या कामासाठी एक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गुंतवून ठेवावा लागतो. प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही. संकेतस्थळ सुरू होण्यात अडचणी येतात. काही वेळा दिवसभर वीज नसते त्यामुळे तो दिवस फुकट जातो. माहिती गोळा करण्यासाठी आम्ही पालक सभेतही पालकांना माहिती दिली होती. मात्र, तरीही विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती अद्याप आलेली नाही,’ असे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
जुलैमध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीचे काम अद्यापही रखडले आहे. सुरुवातीला या प्रणालीत माहिती भरण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तोपर्यंत काम पुढे न सरकल्यामुळे मुदत वाढवण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही माहिती भरून घेण्यात येईल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कोणत्याही एका टप्प्याची माहिती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता विद्यार्थी, शिक्षक, शाळा अशा तिन्ही घटकांची माहिती एकाच वेळी भरण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे.