नुकत्याच ‘सरल’ प्रणालीतील महिती भरण्याचे काम संपवून शाळांचे मुख्याध्यापक श्वास घेतात. तोच आता राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अहवाल पाठवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना आल्या आहेत. त्याचप्रमाणे नैदानिक चाचणीचे निकाल संकेतस्थळावर अपलोड करण्याचे कामही सुरू झाले आहे.
राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, शाळा यांची माहिती एकत्र करण्यासाठी ‘सरल’ ही प्रणाली सुरू करण्यात आली. त्यातील पहिल्या टप्प्याचे म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती भरण्याच्या किंवा ती अद्ययावत करण्याच्या कामासाठी सोमवारी (२६ ऑक्टोबर) अंतिम मुदत होती. हे काम संपवून शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक श्वास घेतात, तोच आता सत्र संपण्याच्या तोंडावर पुढील दोन कामे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मागे लागली आहेत. सध्या राष्ट्रीय शिक्षण धोरण निश्चत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या ‘माय गव्हर्नमेंट’ या संकेतस्थळावर सूचना देता येणार आहेत. शिक्षण, त्याचा हेतू, कौशल्य विकास, मातृभाषेतून शिक्षण, तंत्रशिक्षण अशा विविध चौदा मुद्दय़ांवर आधारित प्रश्नावली देऊन शिक्षकांच्या पातळीवर मते मागवण्यात आली आहेत. शाळेतील शिक्षकांची मते, सूचना लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी ती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. राज्यातील जवळपास ४ हजार शाळांतील मुख्याध्यापकांना पासवर्ड्स देण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती देण्यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही प्रश्नावली भरून देण्यासाठी मुख्याध्यापकांची धावपळ सुरू झाली आहे.
पहिले शैक्षणिक सत्र अवघ्या आठ दिवसांत संपत असल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, त्याचे अहवाल, शैक्षणिक सत्राचे अहवाल याचेही काम सुरू आहे. त्यातच नैदानिक चाचण्यांच्या साखळीतील पहिल्या चाचणीचे गुण संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचनाही शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. सध्या चार जिल्ह्य़ांचे काम सुरू झाले आहे.

पुणे जिल्ह्य़ाचे काम ९७ टक्के पूर्ण
सरल प्रणालीत विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत होती. त्यानंतर एकाही जिल्ह्य़ाला माहिती भरता  येणार नाही, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली होती. पुणे जिल्ह्य़ात अद्याप १६ शाळांनी माहिती भरलेली नाही. मात्र, आता जिल्ह्य़ातील १७ लाख विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीवर असून जिल्ह्य़ाचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. राज्यातील २ कोटी २० लाख विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीत भरण्यात आली आहे.