वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे संस्थापक वेदमहर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त नाशिक येथे दीडशे वर्षे संस्कृत संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्कृत पाठशाळेस यंदाचा सरस्वती उपासना पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वेदभवनचे संस्थापक घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षांस जानेवारीमध्ये प्रारंभ झाला असून वेदाचार्याचा धार्मिक कार्यक्रमानिमित्त ज्या शहरांशी संबंध आला अशा १३ ते १४ शहरांतून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुजींचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे २५ जानेवारी रोजी शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते जन्मशताब्दी वर्ष महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात संस्कृत पाठशाळेस सरस्वती उपासना पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती वेदभवनचे प्रधानाचार्य वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी शनिवारी दिली. जन्मशताब्दी महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्षपद वाराणसी येथील बनारस हिंदूू विश्वविद्यालयाच्या वेदविभागाचे अध्यक्ष डॉ. श्रीकिशोर मिश्र भूषविणार असून डॉ. पी. डी. पाटील हे स्वागताध्यक्ष आणि उदय प्रकाश वारुंजीकर कार्याध्यक्ष आहेत.
त्र्यंबकेश्वर, प्रयाग, गया, काशी, हरिद्वार, मोरगाव, पारनेर,  गोकर्ण महाबळेश्वर, श्री श्री रविशंकर यांचा बेंगळुरमधील आश्रम, नागपूर, नवी दिल्ली, उज्जन, पुण्यातील वासुदेव निवास आणि वेदभवन या ठिकाणी सप्ताह पद्धतीने १०८ ऋग्वेद संहिता महायज्ञाचे आणि ऋग्वेद पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.