सरहद संस्थेतर्फे पूर्वाचलासह विविध राज्यांतील सरहद्दींना संगीताच्या माध्यमातून जोडण्यासाठी पुण्यामध्ये सरहद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत विविध राज्यांतील कलाकार पुणेकरांसमोर आपल्या कलेचा आविष्कार साकारणार आहेत.
संस्थेतर्फे दरवर्षी शनिवारवाडा पटांगणावरील खुल्या रंगमंचावर काश्मीर महोत्सव आयोजित केला जातो. यंदा जानेवारीमध्ये होणाऱ्या या महोत्सवामध्ये ‘भांड पाथर’ या काश्मिरी पारंपरिक लोककलांच्या पथकाला निमंत्रित केले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सरहद महोत्सवामध्ये बोडो, नागा आणि मणिपुरी कलाकार सहभागी होणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्याम आणि अखिल बोडो स्टुडंट्स युनियनचे सहकार्य लाभले आहे. भारताच्या सीमावर्ती राज्यांना संगीत नृत्य कलेची परंपरा असून तिला मुख्य प्रवाहाशी जोडत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी ‘सरहद म्युझिक’ या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. गुरू ग्रंथसाहिबमधील संत नामदेवांच्या पद्यांची ध्वनिमुद्रिका हा सरहद म्युझिकचा पहिला प्रकल्प आहे. रूपकुमार राठोड, संजीव अभ्यंकर, शौनक अभिषेकी आणि मनीषा वाडेकर यांनी या पद्यासाठी गायन केले असून संहितालेखन आणि संगीत जीवन धर्माधिकारी यांचे आहे, असेही नहार यांनी सांगितले.