सरपंच परिषदेमध्ये मान्यवरांचा सूर

पर्यावरणपूरक गाव, कचरा निर्मूलन, शुद्ध पाणीव्यवस्था, महिला सुरक्षा, दारूबंदी, अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर करणारी ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने आदर्श होऊ शकते. गावाला आदर्श आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण करण्यामध्ये सरपंचांनी योगदान द्यावे, असा सूर विविध मान्यवरांनी शनिवारी झालेल्या सरपंच परिषदेत व्यक्त केला.

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि पुणे जिल्हा परिषद, पुणे यांच्यातर्फे आयोजित नवनिर्वाचित सरपंच परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते झाले. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. ग्राम विकासतज्ज्ञ प्रदीप लोखंडे, प्रा. राहुल कराड, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्राम समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील, स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र पवार, नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कमला सावंत व अतुल कोईराल यांच्यासह परिषदेला शंभरहून अधिक सरपंच उपस्थित होते.

डॉ. मुळीक म्हणाले,‘ जनतेची नेत्याकडून खूप अपेक्षा असते. त्यामुळे सरपंचाने प्रत्येक सरकारी योजनांचे चांगल्या मार्गाने पसे मिळवून त्याचा वापर गावाच्या विकासासाठी करावा. ग्रामपंचायतीत ड्रोनचा वापर वाढवल्यास सरपंचाला गावाची आणि शेतीची स्थिती समजण्यास वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला हवा असेल तर गावातील दूध गावातच ठेवा. शेतकऱ्याच्या आíथक समृद्धीसाठी शेतीपूरक व्यवसाय करायला हवेत.’

स्वच्छता आणि बालसंगोपन हे यशाचे गमक आहे. शहरातील पसा ग्रामीण क्षेत्रात कसा आणता येईल या दृष्टीने नवयुवकांनी विचार करावा, असे प्रदीप लोखंडे यांनी सांगितले. कराड म्हणाले,की गांधीजींच्या स्वप्नातील भारत कसा असावा, या संदर्भात ही सरपंच परिषद आहे. देशातील प्रत्येक खेडय़ाचे वैभव हे संस्कृती, प्रेम आणि आदर यावर टिकून आहे. त्याचे जतन करायला हवे.