सोलापुरातील संगीत वारशाच्या जतनासाठी दात्यांना आवाहन

सोलापूर येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयाने भारतीय संगीताचा स्वरवारसा जोपासण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक बुजूर्ग स्वरतपस्व्यांचा संगीत ठेवा आधुनिक माध्यमाद्वारे जतन करण्याचा संस्थेचा संकल्प. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी संग्रहालयाला निधीची आवश्यकता असून दानशूरांनी अर्थसाह्य़ करावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

तब्बल १६५ वर्षांपूर्वी म्हणजेच १८५३ मध्ये सोलापूरमध्ये हे वाचनालय सुरू झाले. वालचंद समूहाने देणगी दिल्यानंतर या वाचनालयाचे ‘श्री हिराचंद नेमचंद वाचनालय’ असे नामकरण झाले. किल्ल्याच्या समोर मुरारजी पेठ येथे असलेल्या या वाचनालयाची नवी वास्तू १९९४ मध्ये आकाराला आली. सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालेले ज्येष्ठ संगीत अभ्यासक आणि मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी हे या वाचनालयाचे आधारस्तंभ होते. त्या कालखंडात सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स या संस्थेची सोलापूर शाखा कार्यरत होती. जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी हे दोघे जण या संस्थेमार्फत ग्रामोफोनद्वारे रसिकांना दुर्मीळ संगीत श्रवणाचा आनंद देत होते. आपल्याकडील दुर्मीळ संगीत तबकडय़ांचा संग्रह सुरक्षित राहावा, या हेतूने तो वाचनालयाकडे सुपूर्द करीत या वास्तूमध्ये संगीत संग्रहालय सुरू करण्याची संकल्पना या दोघांनी मांडली. डॉ. श्रीराम पुजारी यांनी ती केवळ उचलूनच धरली असे नाही, तर स्वतंत्र जागाही मिळवून दिली.

एवढेच नव्हे तर व्यक्तिगत संग्रहातील दिग्गज कलाकारांच्या मैफलींचे ध्वनिमुद्रणही त्यांनी संग्रहालयाला भेट स्वरूपात दिले. या क्षेत्रातील त्यांचे योगदान ध्यानात घेता वाचनालयाने या संगीत संग्रहालयाचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’ असे नामकरण केले. संगीत संग्रहालयामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, कर्नाटक संगीत, वाद्यसंगीत, चित्रपटगीते, नाटय़गीते, भावगीते अशा वैविध्यपूर्ण संगीताचा संग्रह आहे. वेगवेगळ्या १८ गायकांच्या स्वरांतील ‘बाबुल मोरा’ ही बंदिश हे या संग्रहालयाचे वैशिष्टय़ आहे. ग्रामोफोन रेकॉर्ड्स, कॅसेट्स, सीडी, व्हीसीडी, पेन ड्राइव्ह अशा विविध स्वरूपांतील या संगीत संग्रहाचे डिजिटायझेशन करण्याचा वाचनालयाचा संकल्प आहे. त्यासाठी वाचनालयाला निधीची आवश्यकता असून समाजातील दानशूरांनी अर्थसाह्य़ करावे, असे आवाहन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

नागपूर : महाराष्ट्राच्या वैचारिक बांधणीत ‘लोकसत्ता’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे दैनिक समाजोपयोगी विचारांच्या प्रसाराचे केवळ माध्यमच नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवणारा एक सक्षम मंचही आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाने हे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. शनिवारी ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम म्हणजे सकारात्मक पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहे. जनतेने अशा उपक्रमांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.