28 February 2021

News Flash

‘ससून’च्या निधीवर डल्ला

२००९ मध्ये ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाले.

ससून सवरेपचार रुग्णालय

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडून जळगावातील महाविद्यालयासाठी निधी वर्ग

पुणे : ससून सवरेपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी मिळालेला निधी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील नवीन नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्ग करण्यात आला आहे. ससूनची कामे मार्गी लागण्यासाठी या निधीची आवश्यकता असून या विषयात पुण्याच्या आमदारांनी लक्ष घालावे अशीही मागणी होत आहे.

गिरीश महाजन यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर ससून रुग्णालयासाठी असलेला निधी त्यांच्या जिल्ह्य़ातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्ग करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून नवीन इमारतीतील शिल्लक राहिलेल्या अंतर्गत कामांसाठी करण्यात आलेली इ-निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द करण्यात आली आहे.

गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देणारे ससून रुग्णालय हे जिल्ह्य़ातील एकमेव रुग्णालय असतानाही सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी या रुग्णालयाच्या विकासाबाबत पुरेसे गंभीर नसल्याचे निधी वळवण्याच्या प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या दबावामुळेच हा निधी वळवण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी या प्रकरणात केला आहे.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले,‘अकरा मजली इमारतीच्या अंतर्गत कामांसाठी करण्यात आलेली इ-निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे कामाचा खोळंबा होत असून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र निधीचे काय झाले याबद्दल कोणतीही कल्पना आम्हाला नाही.’

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना २००९ मध्ये ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाले. २०१० पर्यंत ७४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. २०१५ पर्यंत त्यातील ६५ कोटी रुपये खर्च झाले. त्यानंतर मार्च २०१६ मध्ये अंतर्गत कामांसाठी १०९ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आणि २०१७ साठी या कामाची निविदा तयार करण्यात आली. मात्र ही निविदा प्रक्रिया नुकतीच रद्द करण्यात आली आहे.

‘पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे’

ससून सवरेपचार रुग्णालय हे जिल्ह्य़ातील गरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणारे एकमेव रुग्णालय असल्याने त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि सर्व आमदारांनी अर्थमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठक घेतली तर ससून रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढणे शक्य होईल, असे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 3:10 am

Web Title: sasson hospital fund transfer to medical college in jalgaon after gish mahjan pressure
Next Stories
1 कर्वे रस्त्यावरील लूटप्रकरणात चोराऐवजी तक्रारादाराचा शोध!
2 नाटक बिटक : वाचनातून उलगडणार मराठी रंगभूमीचा पट!
3 मुलाखत : संत साहित्य आजही उपयुक्त
Just Now!
X