राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा सर्वाधिक दर पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्य़ात बुधवारी संध्याकाळपर्यंत ४२७ रुग्णांची नोंद झाली, त्यांपैकी ४३ रुग्णांचा या आजाराचा सामना करत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पुण्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे, १०.०७ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या परिस्थितीत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची गुरुवारी रात्री उशिरा बदली करण्यात आली.  रुग्णालयात येणारा रुग्ण हा अंतिम टप्प्यात येत असल्याने रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नाही, त्यामुळे लवकरात लवकर रुग्णालयात येण्याचे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात येत होते. तरी देखील तडकाफडकी ही बदली झाल्याचे दिसत आहे.

मुंबईचा मृत्युदर पुण्याच्या तुलनेत कमी म्हणजे ६.३३ टक्के एवढा असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी संध्याकाळी नोंद झालेली महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २,९१६ आहे. त्यांपैकी १८७ रुग्ण राज्यात दगावले आहेत. त्यामुळे राज्यातील मृत्युदर ६.४१ टक्के आहे.  पुण्यातील सर्वाधिक मृत्यू ससून सवरेपचार रुग्णालयात झाल्याचे दिसून आले आहे. बुधवापर्यंत दगावलेल्या ४३ मृतांपैकी सर्वाधिक ३४ मृत्यू ससून रुग्णालयात झाले. रुग्ण आढळण्याचा मुंबईचा वेग सर्वाधिक असला तरी त्यातुलनेत तेथील मृत्युदर कमी आहे.

निर्णय कितपत योग्य?

गेल्या काही दिवसांत, ससून रुग्णालयात करोना विषाणू संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत, त्या पाश्र्वभूमीवर कारवाई म्हणून ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले बदली झाली, अशी चर्चा आहे, मात्र पुणे शहर या विषाणू संसर्गाचा सामना करत असताना अशी तडकाफडकी बदली करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  डॉ. चंदनवाले यांच्याकडे मुंबईतील वैद्यकीय शिक्षण सहसंचालक, आरोग्य या पदाचाही कार्यभार आहे. तातडीने, त्या पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी डॉ. चंदनवाले यांना देण्यात आले असून, सह-अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे ससूनचा पदभार सोपवण्यात आला आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांना करोना संसर्ग रोखता आला नाही. रुग्णांवर योग्य पद्धतीने औषधोपचार ससूनमध्ये होऊ शकले नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांच्या असंख्य तक्रारी होत्या. निष्काळजीपणाच्या चित्रफितीही समोर आल्या आहेत. म्हणून त्यांच्या बदलीची मागणी झाली होती. अजित पवार यांना तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. – अरविंद शिंदे, काँग्रेस गटनेते.