19 March 2019

News Flash

ससून रुग्णालयाच्या प्रयत्नांमुळे गंभीर विकारातही तिला लाभले मातृत्वाचे सुख!

प्रत्यक्ष गर्भधारणेच्या वेळी या महिलेला मनोविकारासाठी तीव्र क्षमतेची औषधे दिली जात होती

ससून रुग्णालय

सरकारी रुग्णालये म्हणजे तुटपुंज्या सोयीसुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपचार पद्धतींबद्दलची अनास्था आणि निष्काळजीपणा, असा समज दृढ झालेला असताना ससून सवरेपचार रुग्णालयामधील एक घटना हे सर्व समज पुसून टाकण्यास पुरेशी ठरली आहे. विवाहानंतर ११ वर्षे वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या आणि ‘पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया’सारख्या गंभीर मानसिक विकाराने ग्रासलेल्या एका महिलेने वयाच्या ३६ व्या वर्षी ससून रुग्णालयात सुदृढ मुलीला जन्म दिला आहे.

वयाच्या या टप्प्यावर बाळाला जन्म देणे हे सर्वसाधारण आरोग्य लाभलेल्या महिलांसाठीही गुंतागुंतीचे असते. अशा परिस्थितीत या महिलेवर ससून रुग्णालयात एकाच वेळी मधुमेह, मनोविकार आणि उशिरा झालेली गर्भधारणा असे गुंतागुंतीचे उपचार करण्यात आले. या महिलेने बाळाला जन्म देण्याची घटना ही दुर्मीळ असून बाळ आणि माता सुरक्षित असल्याचे ससून रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

ससून रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला  १५ व्या वर्षी पॅरानॉईड स्किझोफ्रेनियाने ग्रासले होते. पुढे विवाहानंतर पहिल्यांदा गर्भधारणा अयशस्वी झाली. गेली ११ वर्षे या महिलेवर वंध्यत्वाचे उपचार सुरू होते.

प्रत्यक्ष गर्भधारणेच्या वेळी या महिलेला मनोविकारासाठी तीव्र क्षमतेची औषधे दिली जात होती. गर्भधारणेनंतर ती सुरू ठेवता येणे शक्य नसल्याने एकच योग्य औषध तिला देण्यात आले. मूळची स्किझोफ्रेनियाची रुग्ण, गुंतागुंतीची शारीरिक अवस्था आणि गरोदरपणात झालेले मधुमेहाचे निदान यामुळे  प्राथमिक स्तरावर वैद्यकीय गर्भपात करण्याचा विचार महिलेच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवला होता. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांमुळे आई आणि बाळ सुखरूप राहू शकले. या महिलेला दिल्या जाणाऱ्या औषधांचा बाळाला त्रास न होणे, तिचा समतोल ढासळल्यास तिच्याकडून बाळाला तसेच इतर रुग्णांना कोणताही धोका होऊ नये, अशा अनेक गोष्टींसाठी रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञांना विशेष लक्ष द्यावे लागले.

ससून रुग्णालयातील प्रसूतितज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, भूल तज्ज्ञ, नवजात बालकांच्या विकारांचे तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, डॉक्टर आणि परिचारिकांनी या प्रकरणामध्ये विशेष मेहनत घेतली. डॉ. शिल्पा नाईक, डॉ. अरुण आंबडकर, डॉ. दीपाली जाधव, डॉ. पी. डब्ल्यू. सांभारे, डॉ. वैभव, डॉ. सायली, डॉ. अमोल, डॉ. मेघा यांचा या चमूमध्ये समावेश आहे.

First Published on March 12, 2018 6:17 am

Web Title: sassoon hospital delivery pregnant women suffering from paranoid schizophrenia