30 September 2020

News Flash

ससूनला १०५ कोटींचा निधी मिळणार

ससूनमध्ये रुग्णांना औषधे न मिळणे, कॅथलॅब बंद असणे अशा समस्यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.

| March 3, 2015 03:20 am

ससूनमधील नवीन बांधकाम झालेल्या अकरा मजली इमारतीतील पायाभूत सुविधांसाठी १०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. तसेच ससूनमध्ये रुग्णांना औषधे न मिळणे, कॅथलॅब बंद असणे अशा समस्यांच्या चौकशीचे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.
ससून सवरेपचार रुग्णालयातील विविध समस्यांबाबत तावडे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बैठक झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, जयदेव गायकवाड आदि या बैठकीस उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयास १०५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम खात्याकडून मिळणार आहे. पुढील दोन वर्षांच्या योजनेत हा निधी वर्ग केला जाईल. जुनी उपकरणे बदलणे, नवीन उपकरणांची खरेदी याचा आढावा घेऊन ते टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल. राज्य शासनावर असलेले कर्ज लक्षात घेता ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’मधून प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिधींकडून उद्योगपतींचीही बैठक घेतली जाईल.’’
ससूनच्या प्रश्नांविषयी चौकशीचे आदेश दिल्याचेही तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘ससूनमध्ये रुग्णांना औषधे मिळत नाहीत तसेच ससूनची कॅथलॅब बंद असल्यामुळे रुग्णांना बाहेर जाऊन अधिक पैसे देऊन ती सेवा घ्यावी लागते, या मुद्दय़ांविषयी चर्चा झाली. ससूनच्या प्रश्नांविषयी मी चौकशीचे आदेश दिले असून येत्या आठवडाभरात ही चौकशी होईल. ससून व्यवस्थापनानेही काही अडचणी मांडल्या असून काही निर्णयाच्या, काही यंत्रणेच्या व काही आर्थिक अडचणी यात आहेत. त्याविषयी मुंबईत संबंधित खात्यांच्या मंत्र्याबरोबर बैठक घेऊन अडचणी सोडवू. ससून पुणे व आसपासच्या भागासाठीही महत्त्वाचे रुग्णालय असून त्याचा विस्तार, कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.’’
बी. जे. चे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘ससूनमधील नवीन अकरा मजली इमारत लवकर कार्यान्वित कशी होऊ शकेल याबद्दलही चर्चा झाली. ही इमारत सुरू झाल्यावर ससूनमध्ये ४५० खाटा वाढतील, त्यात ९० खाटा अतिदक्षता विभागाच्या असतील. या इमारतीतील यंत्रसामग्री व फर्निचरसाठी ३५ कोटींची गरज भासणार आहे. ससून प्रांगणातील शवागारासमोर असलेल्या ‘एमएसआरडीसी’च्या जागेत कर्करोग व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याबद्दलही चर्चा झाली.’’
अँजिओग्राफी, एमआरआय या चाचण्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत समाविष्ट केल्या जाव्यात, अशी सूचना तावडे यांना केल्याचेही डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

ससूनमधील अपुऱ्या औषधपुरवठय़ावर ‘ऑनलाइन’ यंत्रणेचा उपाय
अधिष्ठाता डॉ. चंदनवाले म्हणाले, ‘‘ससूनमधील अपुऱ्या औषधसाठय़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी औषधांची मागणी ऑनलाइन करण्याचा पर्याय आम्हाला सुचवण्यात आला आहे. वॉर्डातून ऑनलाइन पद्धतीने औषधांची मागणी नोंदवून औषध दुकानांमधून ती औषधे पुरवली जातील. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत ही यंत्रणा आम्ही राबवणार आहोत.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 3:20 am

Web Title: sassoon hospital vinod tawde fund ppp
टॅग Fund,Vinod Tawde
Next Stories
1 नागरी प्रतिनिधीला जिल्हा परिवहन प्राधिकरणात स्थान नाही
2 समस्यांनी घेरलेल्या उच्च शिक्षणव्यवस्थेचा गुणवत्तेवर परिणाम – इस्रोचे अध्यक्ष
3 राज्यात आजपासून दहावीची परीक्षा १७ लाख विद्यार्थी परीक्षा देणार
Just Now!
X