News Flash

पुणे: टेबलावर जेवण व मद्य देणं हॉटेल्सना पडलं महागात

लग्नात गर्दी केल्याने कार्यालयाचे मालक व वधू-वर पित्यांवर गुन्हे दाखल

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र झपाट्याने वाढत असतानाही मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यामध्ये ५० पेक्षा ज्यादा वर्‍हाडी मंडळी जमवून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन मंगल कार्यालयाच्या मालकांसह आठ जणांवर पुणे जिल्ह्यातील सासवड येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये वधू-वर पित्यांचा समावेश आहे. याशिवाय हॉटेलमधून अन्नपदार्थांचे पार्सल देण्याचा नियम असतानाही टेबलावर ग्राहकांना जेवण व मद्य देणाऱ्या तीन हॉटेल चालकांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे. सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी ही माहिती दिली.

काळेवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयाचे मालक रमाकांत बाळासाहेब काळे, वधू-वर पिता पांडुरंग दत्तात्रय कोलते व शंकर वसंत बडदे तसेच काळे लॉन्सचे मालक संजय ज्ञानदेव काळे, वधू -वर पिता व्यंकट दिगंबर जाधव व सचिन काळूराम पठारे, ढुमेवाडी येथील रिद्धी- सिद्धी मंगल कार्यालयाचे मालक दादासाहेब रामचंद्र पवार यांच्यासह गणेश नामदेव जगताप यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ग्राहकांना जेवणाची पार्सल सुविधा न देता हॉटेलमध्ये जेवण व मद्य दिल्याबद्दल खळद (ता. पुरंदर ) येथील मोहन फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, भिवरी येथील हॉटेल रुद्र गार्डन ,सासवड येथील उत्तम फॅमिली रेस्टॉरंट या तिघांवर कारवाई करण्यात आली.

सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप ,सहाय्यक निरीक्षक राहुल घुगे , पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरांदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लियाकत अली युनूस मुजावर ,पोलीस हवालदार दत्तात्रय माने, सुरज नागरे ,महेश उगले यांनी ही कारवाई केली. मंगल कार्यालयामध्ये ज्यादा गर्दी जमवणे ,तोंडाला मुखपट्टी न लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे यामुळे हे गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी मंगलकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जाते असा प्रकार दिसल्यास नागरिकांनी तातडीने ही माहिती पोलिसांना कळवावी, त्यांचे नाव गुप्त राखले जाईल असे आवाहन सासवड पोलिसांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 8:33 am

Web Title: saswad police register case for crowd in marriage and serving food and alchohol on table in pune sgy 87
Next Stories
1 १७ कारखान्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस
2 पिंपरी चिंचवड पाणीपुरवठा विस्कळीत
3 खाद्यपदार्थ घरपोच सेवेला पुण्यातही परवानगी हवी
Just Now!
X