आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत सासवड येथील आगामी ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाय-टेक होत आहे. साहित्य संमेलनाचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून फेसबुक आणि ट्विटर याच्या माध्यमातून हे संमेलन तांत्रिक प्रगतीच्या जाळ्याने विणले जात आहे. साहित्यप्रेमी असलेला प्रत्येक जण या संकेतस्थळाशी सुसंवादी राहू शकेल.
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन ते पाच जानेवारी या कालावधीत सासवड येथे हे साहित्य संमेलन होत आहे. एकविसाव्या शतकाशी जुळवून घेताना हे संमेलन हाय-टेक करण्याचा संयोजकांचा मानस आहे. यापूर्वीच्या संमेलनांची माहिती देणारी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली होती. सासवड संमेलनाचे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहेच; परंतु संकेतस्थळाच्या बरोबरीने फेसबुक आणि ट्विटर या आधुनिक माध्यमांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे. ‘आयकॉन सोल्यूशन्स’तर्फे या संकेतस्थळाची निर्मिती करण्याबरोबरच तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती कुमार मुदलियार यांनी दिली.
या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संमेलनाचे सभासद होऊ इच्छिणारे सभासद अर्ज ऑनलाईन भरू शकतील. त्याचप्रमाणे डाऊनलोड करून तो हस्ताक्षरामध्येही भरून सादर करू शकतील. ‘कंटेन्ट मॅनेजमेंट बेस्ड वेबसाईट’ हे वैशिष्टय़ असून संमेलनाच्या काळात दर तासाला अद्ययावत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे संकेतस्थळ पाहणारी व्यक्ती आपली मते, अभिप्राय, सूचना यावर नोंदवू शकते. त्यासाठी ‘फोनेटिक लँग्वेज’ ही सोय उपलब्ध आहे. साहित्य संमेलनाविषयी आस्था असणारी व्यक्ती चाळीशी पार केलेलीच असेल हे ध्यानात घेऊन संकेतस्थळावर ठेवण्यात येणाऱ्या मजकुराचा टाईप मोठा करून वाचण्याची सुविधा देण्यात आली आहे. सासवड येथील संमेलन स्थळाचा नकाशा, व्हिडीओ गॅलरी, सासवड परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, साहित्य संमेलनाचा इतिहास आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. http://www.abmss-saswad.com हा या संकेतस्थळाचा पत्ता असून हे संकेतस्थळ शुक्रवारपासून (६ सप्टेंबर) कार्यान्वित होणार आहे.