08 March 2021

News Flash

घराण्याची शिस्त पाळूनही कलाकाराला स्वातंत्र्य घेता येते – ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ

भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जी शिस्त आहे तिचे काटेकोर पालन करावेच लागते.

गाण्याचा असतो तसाच सतारीचाही रियाज असतो. त्यामुळे गाण्याप्रमाणेच सतारवादनाचीही स्वतंत्र शैली असते. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जी शिस्त आहे तिचे काटेकोर पालन करावेच लागते. तालीम गुरु करून घेतो. मात्र, शिस्तीचे पालन केले तरच पुढे जाऊन स्वतंत्र विचार करता येतो. मी सगळ्यांचे संगीत ऐकतो, त्याचा आनंद घेतो; पण कोणाची नक्कल करीत नाही. जे काही करायचे ते स्वत:च्या शैलीनेच. त्यासाठी वेळ लागतो. काही गोष्टी धूसर असतात. पण, प्रयत्न करून आणि त्या प्रयत्नांतूनच शिकतो. जेवढी निरपेक्ष वृत्तीने ही साधना करू तेवढी संगीतातील खोली कळत जाते. घराण्याची शिस्त पाळूनही कलाकाराला स्वातंत्र्य घेता येते.. सतारवादनाच्या माध्यमातून गेली ६५ वर्षे रसिकांना आनंद वाटणाऱ्या उस्ताद उस्मान खाँ यांनी सोमवारी ही भावना व्यक्त केली.
आठ पिढय़ांपासून घराण्यामध्ये संगीताची परंपरा आणि तीन पिढय़ांपासूनचा सतारवादनाचा वारसा असलेल्या घराण्यातील उस्ताद उस्मान खाँ मंगळवारी (२२ सप्टेंबर) वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. ही प्रदीर्घ वाटचाल शब्दबद्ध करण्यासाठी आत्मचरित्र लेखन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. त्यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून शिष्यांतर्फे मंगळवारी सारसबाग गणपती मंदिरामध्ये गुरुपूजनाचा कार्यक्रम होणार असून उत्तरार्धात उस्ताद उस्मान खाँ यांचे सतारवादन होणार आहे. ‘टेंपल ऑफ फाईन आर्ट्स’ संस्थेतर्फे २३ ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये टिळक स्मारक मंदिर येथे अमृतमहोत्सवी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उस्ताद उस्मान खाँ यांची कन्या रुकैय्या खाँ-देशमुख आणि नात मध्यमी देशमुख त्यांचा संगीताचा वारसा पुढे नेत आहेत.
पाच वर्षांचा असताना वडिलांनी सतार हे एकमेव खेळणं मला आणून दिले. सतार वाजवायची की नाही हे ठरविण्याचे काही वय नव्हते. पण, नंतर दोन वर्षांनी माझे शिक्षण सुरू झाले. नवव्या वर्षी आकाशवाणीच्या धारवाड केंद्रासाठी माझा पहिला सतारवादनाचा कार्यक्रम झाला. रोटरी क्लब ऑफ धारवाडने माझा स्वतंत्र वादनाचा पहिला कार्यक्रम घेतला. माझ्या कलाकार म्हणून जडणघडणीचे श्रेय वडिलांनाच द्यावे लागेल, या आठवणींना खाँसाहेबांनी उजाळा दिला. आमच्या वेळेस गुरुकुल पद्धतीने तालीम एवढाच शिक्षणाचा मार्ग होता. आता मुलांना कॅसेट्स, रेकॉर्ड्स, इंटरनेट, व्हॉटस अॅप अशी आधुनिक माध्यमे उपलब्ध झाली आहेत. आपली साधना पूर्णत्वास जाण्यासाठी ही साधने महत्त्वाची आहेत. साधनेतून सिद्धी होत असते. मात्र, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. जिद्द आणि संयम बाळगला तरच कलाकार निभावून जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. माझ्यावर पुणेकरांनी मनापासून प्रेम केले. १७ वर्षांचा असताना सतार घेऊन मी पुण्याला आलो आणि शून्यातून विश्व निर्माण केले. या वाद्याने मला जगाची सफर घडविली. कलाकार म्हणून मी समाधानी आणि कृतार्थ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 3:20 am

Web Title: satar player ustad usman kha
Next Stories
1 मुठाई नदी महोत्सवास २ ऑक्टोबरपासून प्रारंभ
2 नगरसेवक टेकवडे यांच्या कुटुंबीयांना सर्वपक्षीय नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन
3 BLOG : बघा तुम्हालाच कसं वाटतंय!
Just Now!
X