अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन होत असताना त्याच दिवशी (५ सप्टेंबर) मॉरिशस येथे पाचव्या स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येत असलेल्या या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी झाले. शिवसंघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश गायकवाड आणि डॉ. प्रसाद िपपळखरे या वेळी उपस्थित होते.मॉरिशस येथील रवींद्रनाथ टागोर सभागृह येथे हे संमेलन होणार असून सकाळी नऊ वाजता ग्रंथिदडीने प्रारंभ होणार आहे. मॉरिशसचे सांस्कृतिकमंत्री सांताराम बाबू हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनास मॉरिशस मराठी मंडळाचे बलराज नारू आणि मराठी भाषक युनियनचे अध्यक्ष बालाजी मारुती यांचे सहकार्य लाभले आहे. दुपारच्या सत्रात डॉ. भास्कर गिरीधारी, प्रभाकर शिरपूरकर, प्रा. सतीश पोरे, आशा टकले आणि संध्या गर्गे हे सावरकरांच्या साहित्यावर बोलणार आहेत. ‘मराठी साहित्यातील राष्ट्रभक्तीचा स्फूलिंग आणि सावरकरांचे साहित्य’ या विषयावरील परिसंवादात कलावती सुर्वे, प्रसाद िपपळखरे, सुनंदा आपटे आणि केशव वझे सहभागी होणार आहेत. स्थानिक कलाकार मॉरिशसचे पारंपरिक नृत्य सादर करणार आहेत, असे नीलेश गायकवाड यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वैभवशाली साहित्यावर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारण्यात आलेले नाही. सर्व सावरकरप्रेमी या संमेलनास स्वखर्चाने उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.