डॉक्टर मला ‘मुलगी’ होऊ द्यायची नाही; पहिली मुलगीच आहे, तिच्या पाठीवर आता मुलगा हवाय.. बाळंतपणासाठी रुग्णालयात आलेल्या डॉक्टरांना महिला असे सांगतात. मात्र, मुलगी झाल्यावरही तिच्या चेहऱ्यावर समाधान असते, कारण मुलगी झाली म्हणून तिला मिठाई अन् गुलाबाच्या फुलाची भेट मिळते आणि रुग्णालयाचा सर्व खर्च माफही होतो.
मुलगी वाचविण्यासाठीचे अभियान म्हणून पुण्यातील एका डॉक्टरकडून अशी मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत गेल्या तीन वर्षांत त्यांनी तब्बल ३२७ मुलींच्या जन्माचे अशा प्रकारे स्वागत केले असून, अजूनही हे कार्य सुरूच ठेवले आहे. डॉ. गणेश राख हे या डॉक्टरांचे नाव. त्यांनी ३ जानेवारी २०१२ पासून ‘मुलगी वाचवा अभियान’ सुरू केले आहे. हडपसरमधील माळवाडी येथे (अॅमनोरा सिटीशेजारी) त्यांचे ‘मेडिकेअर’ या नावाचे रुग्णालय आहे. तेथे त्यांनी हे अभियान सुरू केले आहे. अजूनही मोठय़ा संख्येने माता मुलींना जन्म द्यायला तयार नसतात. हे चित्र बदलण्यासाठी आपला सहभाग देण्याच्या हेतूने डॉ. राख यांनी हे अभियान सुरू केले. त्यासाठी त्यांनी आपल्या रुग्णालयात होणारा प्रत्येक मुलीचा जन्म साजरा करण्याचे ठरवले. त्याचाच भाग म्हणून ते मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वानाच मिठाई वाटतात आणि आईला गुलाबाचे फूल देतात. याच्या पुढे जाऊन ते त्यासाठी होणारा कोणताही खर्च घेत नाहीत, मग ते सामान्य बाळंतपण असो, नाहीतर सीझर असो! ते आवश्यक ते सर्व उपचारही देतात, पुरेसा काळ माता व मुलीला रुग्णालयात ठेवून घेतात. या काळात होणाऱ्या उपचारांसाठी ते कोणतेही शुल्क आकारत नाहीत.
नवजात अतिदक्षता विभागातही (एनआयसीयु) त्यांनी आतापर्यंत ३० मुलींना असाच विनामूल्य उपचार दिला आहे. तसेच, त्यांनी मुली वाचवा जनजागृतीसाठी १ हजार १०० डॉक्टरांना भेट दिली असून, त्यांना मुली वाचवण्यास प्रोत्साहन दिले आहे. राख यांना दिल्ली विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ आणि विविध महिला संघटनांनी बोलावले आहे. या कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले आहे.

‘‘समाजात जोवर मुलीच्या जन्माचे स्वागत होणार नाही, तोपर्यंत महिलांवरील अन्याय बंद होणार नाहीत. हे बदलण्यासाठी आधी लोकांनी मुलीबद्दलची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मी हे अभियान सुरू केले आहे. समाजाचे पूर्णपणे मतपरिवर्तन होत नाही, तोपर्यंत माझे हे अभियान सुरूच राहील. त्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे.’’ – डॉ. गणेश राख