सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रोडच्या परिसरातील १२ झाडे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शनिवारी तोडली. याप्रकरणी शहरातील पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी विद्यापीठ परिसरात पालिका प्रशासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. विद्यापीठ गेटजवळ असलेल्या जुन्या पोलीस चौकीजवळील पाच तर उर्वरित सात अशी एकूण बारा झाडे तसेच काही झाडांच्या पारंब्या तोडण्यात आल्या आहेत.

हरित न्यायाधिकरणाने अथवा वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय महापालिकेने बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी वैशाली पाटकर यांना केला. आम्ही पर्यावरणप्रेमी असलो तरी विकासाला आमचा विरोध नाही. परंतु अधिकार्‍यांकडून नागरिकांना विश्वासात घेतले जात नाही. प्रशासनाने केलेली वृक्षतोड पूर्णपणे बेकायदा आहे. त्यामुळे दोषींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे. या प्रकरणी अद्याप बांधकाम विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्याचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा देखील पर्यावरण प्रेमींनी कारवाईला तीव्र विरोध केला होता. तिथेच ठिय्या मांडला होता. पुन्हा वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरण प्रेमी पुन्हा प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.