15 October 2019

News Flash

उत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार, टॅब आणि शॉपिंग मॉल हवा!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांना उत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार देण्याची मागणी अधिसभा सदस्य अभिषेक बोके यांनी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चिन्मय पाटणकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्यांच्या विद्यापीठाकडे मागण्या

संसद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्काराप्रमाणेच विद्यापीठातील सदस्याला उत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार द्यावा, विद्यापीठीय कामकाजासाठी अधिसभा सदस्यांना टॅब्लेट द्यावा अशा मागण्या अधिसभा सदस्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केल्या आहेत. अधिसभा सदस्यांच्या या मागण्यांमध्ये ‘शैक्षणिक’ काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शनिवारी (२० एप्रिल) होणार आहे. या अधिसभेत सदस्यांकडून मुख्यत्वे शैक्षणिक समस्या, विद्यार्थी-प्राध्यापक, कर्मचारी, विद्यापीठाचे धोरण या संदर्भात आवाज उठवणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे अपेक्षित असते. मात्र, सदस्यांकडून काही अशैक्षणिक मागण्या, ठराव मांडण्यात आल्याचे अधिसभेच्या कार्यपत्रिकेवरून दिसून येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांना उत्कृष्ट अधिसभारत्न पुरस्कार देण्याची मागणी अधिसभा सदस्य अभिषेक बोके यांनी केली आहे. तसेच विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांचा जॉगिंग क्लब स्थापन करण्याचेही त्यांनी सुचवले आहे. तर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या धर्तीवर विद्यापीठीय नोंदीसाठी सर्व अधिसभा सदस्यांना त्यांचा कार्यकाळ संपेपर्यत टॅबलेट देण्याची मागणी विवेक बुचडे यांनी केली आहे. दादाभाऊ शिनलकर यांनी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी देण्यात येणाऱ्या जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी अधिसभा सदस्यांनी शिफारस केलेल्या नावांचा विचार करण्याचा ठराव मांडला आहे.

नव्याने बांधलेल्या वर्ग ३ इमारतीसमोरील बागेत जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम आणि लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क करण्याचा ठराव हनुमंत खांदवे यांनी मांडला आहे. तसेच विद्यापीठाच्या निवासामध्ये राहणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शॉपिंग मॉल, फूड मॉल बांधण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

विद्यावेतनाच्या मुद्दय़ावर चर्चा होणार?

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना अनुदान देणे थांबवले आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यापीठ फंडातून विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यावेतन थकल्याने काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पीएच.डी. व एम.फिल.च्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना विद्यावेतन न देता गुणवत्तेनुसार ते देण्यासाठी भारतरत्न जेआरडी टाटा गुणवंत विद्यार्थी संशोधक योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अधिसभा सदस्यांनी विद्यावेतनाबाबत दोन्ही बाजूने शिफारसी-मागण्या केल्या आहेत. सदस्य शशिकांत तिकोटे यांनी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन भविष्यात बंद करू नये असा ठराव मांडला आहे.संलग्न महाविद्यालयांच्या संशोधन केंद्रातील विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन देण्याची मागणी सदस्य संतोष ढोरे यांनी केली आहे. तर दादाभाऊ शिनलकर यांनी पीएच.डी. व एम.फिल.च्या विद्यार्थ्यांचा सहा महिन्यांची प्रगती पाहण्याची शिफारस केली.

First Published on April 18, 2019 12:58 am

Web Title: savitribai phule pune university demands for the council of the member