03 August 2020

News Flash

एकस्व अधिकार, बौद्धिक संपदेतील फरक विद्यापीठाला कळेना!

माहितीच्या अधिकाराला उत्तर देताना विद्यापीठाने एकस्व अधिकारांसंदर्भातीलच माहिती देणे अपेक्षित होते.

एकस्व अधिकारासंदर्भातील प्रश्नाला बौद्धिक संपदेचे उत्तर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला बौद्धिक संपदा (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स) आणि एकस्व अधिकार (पेटंट) यातील फरक कळत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. माहितीच्या अधिकारात विद्यापीठाकडे एकस्व अधिकारांसंदर्भातील माहिती विचारली असता, विद्यापीठाच्या माहिती अधिकार विभागाने बौद्धिक संपदेची माहिती देण्याची ‘कामगिरी’ केली आहे.

विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांकडून दाखल करण्यात आलेले एकस्व अधिकार, त्यावर झालेला खर्च या संदर्भातील माहिती ‘लोकसत्ता’ने माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यामुळे माहितीच्या अधिकाराला उत्तर देताना विद्यापीठाने एकस्व अधिकारांसंदर्भातीलच माहिती देणे अपेक्षित होते. असे असताना, विद्यापीठाकडून बौद्धिक संपदेवरील खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. वास्तविक बौद्धिक संपदेमध्ये स्वामित्व हक्क (कॉपीराइट), ट्रेड मार्क (व्यापार चिन्ह), भौगोलिक ओळख (जीआय), एकस्व अधिकार (पेटंट) या सर्वाचा समावेश होतो. विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये बौद्धिक संपदा असे लेखाशीर्ष आहे. त्यामुळे एकस्व अधिकारांवर झालेल्या खर्चाची स्वतंत्रपणे नोंद ठेवली जात नसल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले. मात्र, बौद्धिक संपदा या लेखाशीर्षांअंतर्गत विद्यापीठाने स्वामित्व हक्क, भौगोलिक ओळख, एकस्व अधिकार यांचा तपशील स्वतंत्रपणे नोंदवणे आवश्यक आहे.

बौद्धिक संपदेसाठी जेमतेम २५ टक्केच खर्च!

विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचे एकस्व अधिकार नोंदवण्यासाठी विद्यापीठाकडून अर्थसहाय्य केले जाते. त्यासाठी आधी १० लाख रुपये तरतूद करण्यात येत होती. तर गेली काही वर्षे २० लाखांची तरतूद करण्यात येते. या  योजनेमध्ये एकस्व अधिकार दाखल करण्यासाठीची रक्कम मध्यस्थ संस्थेला (एजन्सी) दिली जाते. त्या संस्थेमार्फत एकस्व अधिकारांची नोंदणी केली जाते. या योजनेअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या २५ एकस्व अधिकारांपैकी १९ एकस्व अधिकार मान्य करण्यात आले, तर पाच एकस्व अधिकारांना अद्यापही मान्यता मिळालेली नाही. गेल्या आठ वर्षांत मिळून जवळपास एक कोटींपेक्षा जास्त तरतूद असूनही केवळ २६ लाख ९१ हजार ३५० रुपयेच खर्ची पडल्याचे माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरातून दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 1:23 am

Web Title: savitribai phule pune university intellectual property rights patent copyright trademark trademark akp 94
Next Stories
1 लोणावळा-दौंडसाठी ‘डेमू’
2 शहरात चार हजार ठिकाणी ‘क्यूआर कोड’
3 पंचवीस चौकांमध्ये वाहनचालकांसाठी त्रिमितीय पट्टे
Just Now!
X