बहारदार गायन, मंत्रमुग्ध करणारे वादन आणि नेत्रदीपक नृत्याविष्कार अशा संगीताच्या त्रिवेणी संगमाचा आनंद ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त शनिवारी रसिकांनी लुटला.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील शनिवारच्या सत्राला किराणा घराण्याचे युवा गायक ओंकारनाथ हवालदार यांच्या गायनाने सुरुवात झाली. किराणा घराण्याच्या सहाव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले ओंकारनाथ हे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. माधव गुडी आणि डॉ. नागराज हवालदार यांचे शिष्य आहेत. त्यानंतर शाकीर खान आणि तेजस उपाध्ये यांच्या सतार आणि व्हायोलिन सहवादनाच्या मैफलीमध्ये विजय घाटे यांच्या तबल्याच्या साथीने रंग भरले.

वाराणसी येथील रामकृष्ण मठाचे स्वामी कृपाकरानंद यांच्या गायनाची मैफल सर्वानाच आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारी ठरली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना या वेळी मंडळाच्या विश्वस्त शुभदा मुळगुंद यांच्या हस्ते वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आज (दुपारी १२ वा.)

अतुल खांडेकर, चंद्रशेखर वझे, रुचिरा केदार, पं. उपेंद्र भट,

पं. अजय चक्रवर्ती, डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन, तर नीलाद्री कुमार यांचे सतारवादन होणार आहे.