पुण्यातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठेच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या तारखा जाहीर झाल्या असून ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे हा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये अनेक युवा, ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि वादक आपली कला सादर करणार आहेत.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चे हे ६७ वे वर्ष असून या वर्षीच्या महोत्सवात कला सादर करणाऱ्या कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानुसार, यंदाच्या महोत्सवात २९ कलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि परदेशी कलाकार सहभागी होणार आहेत.

महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे –

  • बुधवार, ११ डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत) : गिरीश संझगिरी यांच्या गायनाने महोत्सवाला सुरुवात होणार असून यानंतर जयंती कुमरेश यांचे कर्नाटकी शैलीतील वीणावादन होणार आहे. नंतर पं. माणिक वर्मा यांच्या शिष्या असलेल्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल त्यानंतर ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
  • गुरुवार, १२ डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत) : दुस-या दिवसाची सुरुवात संदीप भट्टाचार्जी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर मनोज केडिया व मोरमुकट केडिया या बंधूंचे सरोद व सतार वादन होईल. यानंतर मंजिरी कर्वे–आलेगांवकर यांचे गायन आणि समारोप पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनाने होईल.
  • शुक्रवार, १३ डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत) : तिस-या दिवसाची सुरुवात ‘धृपद सिस्टर्स’ अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर आणि अनुजा बोरुडे यांच्या सादरीकरणाने होईल. यानंतर विराज जोशी यांचे गायन होईल. त्यानंतर केन झुकरमन यांचे सरोदवादन होईल. तिस-या दिवसाचा समारोप संगीतमार्तंड पं. जसराज यांच्या गायनाने होईल.
  • शनिवार, १४ डिसेंबर (दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत) : ओंकारनाथ हवालदार यांच्या गायनाने शनिवारच्या महोत्सवाला सुरुवात होईल. यानंतर तेजस उपाध्ये आणि शाकीर खान यांचे व्हायोलिन व सतार सहवादन होईल. त्यानंतर रामकृष्ण मठाचे संन्यासी स्वामी कृपाकरानंद यांचे गायन होईल. यानंतर ओडिसी नृत्यांगना रीला होता यांचे ओडिसी नृत्य होईल. त्यानंतर ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे–देशपांडे गायन सादर करतील. त्यानंतर व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने शनिवारच्या दिवसाचा समारोप होईल.
  • रविवार, १५ डिसेंबर (दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत) : महोत्सवाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात अतुल खांडेकर यांच्या गायनाने होईल. त्यांनंतर रुचिरा केदार आणि चंद्रशेखर वझे यांचे गायन होईल. यानंतर प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांचे सतारवादन होईल. त्यानंतर पं. उपेंद्र भट गायनकला सादर करतील. त्यानंतर ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन आणि परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल.

महोत्सवात पहिल्यांदाच कला सादर करणारे कलाकार –

संदीप भट्टाचार्जी, मनोज केडिया व मोर मुकुट केडिया (केडिया ब्रदर्स), अमिता सिन्हा महापात्रा, जान्हवी फणसळकर व अनुजा बोरुडे (धृपद सिस्टर्स), विराज जोशी, ओंकारनाथ हवालदार, तेजस उपाध्ये, स्वामी कृपाकरानंद, रीला होता, अतुल खांडेकर, रुचिरा केदार.

अधिक माहितीसाठी http://www.esawai.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.