News Flash

कन्या सासुऱ्यासी जाये। मागे परतोनि पाहे।।

अतिशय शांत, संथ स्वरांचा विस्तार, गमक व घसीट हे गानप्रकार सुंदर सादर केले.

सत्र पहिले

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६४ वे वर्ष; नेहमीच्याच सुस्वरांच्या भुकेसाठी वर्षभर वाट पाहात असलेली रसिक मंडळी दैनंदिन जीवनाच्या खटपटी, लटपटी पूर्णत: सोडून नि:संग मनाने या स्वरपंढरीत वेगाने जमू लागली. बघता बघता हा स्वर दरबार पूर्ण भरून गेला.

परम मंगल सुरांचे बादशाह उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे पट्टशिष्य पं. एस. बल्लेश आणि कृष्णा बल्लेश यांचे सनई वादन झाले. सर्वप्रथम ‘मारुबिहाग’ ही विलंबित एकतालातील गत सादर केली. स्वराला आणि तालाला दोघेही कलाकार अतिशय पक्के. अतिशय शांत, संथ स्वरांचा विस्तार, गमक व घसीट हे गानप्रकार सुंदर सादर केले. द्रुतात १३ व्या मात्रेपासून सुरू होणारी गत अतिशय भावपूर्ण अंत:करणाने सादर केली. तार सप्तकामधील पुकार व तंतकारीने अंगावर रोमांच उभे केले. यानंतर राग ‘जोग’मध्ये त्रितालात मध्य द्रुतलयीतील गतीमुळे मनात विरक्ती, हुरहूर असे भाव निर्माण होऊ लागले. विविध स्वरांची आंदोलने आणि पारंपरिक डुग्गीची साथ (दुक्कड – छोटा नगारा) यामुळे अशी मनोअवस्था झाली, की हे वादन संपूच नये. सासरी जाणाऱ्या मुलीचे वर्णन संत तुकोबांच्या अतिशय उत्कट शब्दात सांगायचे झाले, तर ‘कन्या सासुऱ्यासी जाये। मागे परतोनि पाहे।’ अशी रसिकांची अवस्था झाली. शेवटी ‘याद पिया की आये।’ ही उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांची अजरामर ठुमरी सादर करून हे अविस्मरणीय वादन थांबविले.

यानंतर गौरी पाठारे यांचे गायन झाले. सुरुवातीस ‘भीमपलास’ या रागातील ‘रे बिरहा’ ही बंदिश विलंबित त्रितालात सादर केली. तबला पं. रामदास पळसुले, तर स्वर संवादिनीवर सुधीर नायक होते. संथ बांधेसूद स्वरलगाव, बंदिशीची खटके व मुरक्या यामधून स्वर वाक्यांची बढत गाण्यातील शिस्त दिसत होती. द्रुत त्रितालातील ‘धीरज मे धूम मचायी।’ ही बंदिश सादर केली. यानंतर सायंकालीन ‘श्री’ हा गंभीर भक्तिरसप्रधान अतिप्राचीन राग मध्य झपतालात सादर केला. ‘हरी के चरण।’ हे बोल होते तर द्रुत एकतालातील बंदिशीचे बोल होते, ‘सांज भयी। सारे्मपध्। परैसा। या स्वरांच्या संगतीमधून ‘श्री’चे स्वरूप विशेष उलगडत होते.

शेवटी मिश्र मांड, खमाज या रागांमधील दादरा वेगवान लग्गीच्या साथीमधून मोठय़ा नजाकतीने पेश करून आपले गायन थांबविले.

आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे उस्ताद इर्शाद खाँ यांचे सूरबहार वादन. हे वाद्य वाजविणारे फारच थोडे कलाकार राहिले आहेत. बाबा अल्लाउद्दिन खाँ या ऋषितुल्य व्यकिमत्त्वाने हे वाद्य आपली कन्या विदुषी अन्नपूर्णा देवी यांना शिकविले; त्यांनीही ते अजरामर केले. कासवाच्या पाठीसारखा तुंबा, तर त्याचा वीणा-दंड सतारीच्या दांडय़ापेक्षा थोडा रुंद, सर्वच तारा थोडय़ा जास्त भरीव.

सर्वप्रथम ‘शुद्ध कल्याण’ सादरीकरणासाठी घेतला. या रागातील आलापी उस्तादजींनी खूप दमदारपणे मांडली. खर्ज सप्तकामधील नादमधुर आसयुक्त स्वर लगाव, वादी संवादीचे भान सतत ठेवून केलेल्या खर्ज सप्तकाचा विस्तार आपल्या वादनामधून अभिजात ‘मैहर’ घराण्याची वैशिष्टय़े दाखवित होते. सर्व वाद्य वादकांचे माहेरघर म्हणजे ‘मैहर’ घराणे आहे. ते स्वत: ‘इटावा’ घराण्याचे आहेत. हळूहळू एकएक स्वरांची बढत घेऊन रागाचे एकएक पदर उलगडून दाखविले जात होते. मींडकाम, संथ गमकयुक्त आलापी असे अतिशय देखणे वादन होते. आलाप जोड झाला वाजवून सुराने आणलेली बहार या सूरबहार वाद्याने शेवटी थांबवली.

नंतर सतारीवर राग ‘नंद कल्याण’ची गत झपतालात सादर केली. पं. अरविंदकुमार आझाद यांनी सुरुवातीसच तबल्यावर उठाण घेऊन वातावरणातील मरगळ झटकली. याच रागामधील त्रितालामधील गत व शेवटी ‘केरवा’ तालात पिलू ठुमरी ‘सैया बोलू ’ सादर केली. मात्र मध्येच गायन करणे हे औचित्याला धरून वाटले नाही.

आजच्या या स्वरसोहळ्याची सांगता पं. गणपती भट यांच्या कसदार गाण्याने झाली. ‘मधुकंस’ रागामधील ‘बात ना मानी’ ही विलंबित एकतालामधील बंदिश सुरेल सादर केली. लयकारीच्या अंगाने बोलतानांनी ‘मधुकंस’ लगेचच उभा करण्याचे सामथ्र्य या गुणी गायकात आहे. तर्कसंगत, भावपरिपोषक आलापी व उपज अंगाने केलेली बढत या रागाचे सौंदर्य वाढवित होते. तिन्ही सप्तकात फिरणारी संचारी,आलाप, ताना झाल्यानंतर द्रुत त्रितालात ‘मोरा मन लुभाये सावरिया’ ही बंदिश सुरेख सादर केली.

याच मधुकंसमध्ये तराणा खूप ताकदीने गायला. पंडितजी द्रुत मत्त तालात सरगमने, लयकारी रंजकता वाढवित होते. काही वेळ त्रिवट हा तबल्याचे बोलून गायचा दुर्मीळ प्रकार ऐकवला. यानंतर ‘रघुनंदन आगे नाचूँगी’ हे ‘बिलावल’ रागावर आधारित मीरा भजन, भजनी ठेक्यात सुरेख सादर केले.

शेवटी ‘भैरवी’ दादरा तालात सादर केली. ‘चतुरंगे चंद्रमना’ हे कानडी काव्य सर्व रसिकांना वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेले.

आजचा हा स्वरसोहळा खूपच दर्जेदार सादरीकरणाचा ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2016 3:35 am

Web Title: sawai gandharva bhimsen mahotsav
Next Stories
1 मेट्रोला निधी कमी पडू देणार नाही – गिरीश बापट
2 पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून राजकीय डावपेचांना सुरुवात 
3 महिन्यानंतरही रांगेतच!
Just Now!
X