पं. फिरोज दस्तूर जन्मशताब्दीनिमित्त शिष्यांची भावना

पुणे : किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्यासारखे दिग्गज गुरू म्हणून लाभले हे आमचे भाग्यच आहे. ताना, आलापी आणि सरगम यांवर विलक्षण प्रभुत्व असलेल्या गुरुजींचे सुरांकडे काटेकोर लक्ष असायचे. शिष्याकडून लागलेला चुकीचा स्वर आणि अचूक स्वर कोणता असला पाहिजे हे ते स्वत: गाऊन दाखवायचे. त्यांच्या ‘यमन’चे सूर प्रत्येक वेळी वेगळेच असायचे. गुरुजी म्हणजे स्वरज्ञानाची अत्युच्च पातळी गाठलेले महान गायक.. अशा शब्दांत ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्या आठवणींना गिरीश संझगिरी आणि चंद्रशेखर वझे या शिष्यांनी उजाळा दिला.

सवाई गंधर्व महोत्सव १९५३ मध्ये सुरू झाला. सवाई गंधर्व यांचे शिष्य पं. फिरोज दस्तूर पहिल्या वर्षीपासून महोत्सवात सहभागी व्हायचे. २००८ मध्ये त्यांचे निधन  होईपर्यंत ५६ वर्षांच्या काळात त्यांनी न चुकता हजेरी लावली. त्यांच्यासमवेत तानपुऱ्याची साथ करण्यासाठी आम्ही महोत्सवामध्ये सहभागी व्हायचो. पुढे याच मंचावर गुरूसमोर स्वतंत्रपणे कला सादर करता आली. आता गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत आम्हाला महोत्सवामध्ये सेवा रूजू करण्याची संधी लाभली याचा आनंद झाला असल्याचे संझगिरी आणि वझे यांनी सांगितले. संझगिरी म्हणाले, २००१ मध्ये सवाई गंधर्व स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी मी गायलो होतो. त्यानंतर २००४ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवामध्ये माझे गायन झाले होते. २००५ मध्ये जळगाव तसेच २०१७ मध्ये बडोदा येथील सवाई संगीत उत्सवात गाण्याची संधी मिळाली. आता १५ वर्षांनंतर पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात गुरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त सेवा करण्याची संधी माझ्यासाठी खास आहे. १९८३ ते २००८ अशी २५ वर्षे गुरुजींची मला तालीम मिळाली. त्यांना तानपुऱ्याची साथ करण्यासाठी मी पहिल्यांदा या स्वरमंचावर आलो तेव्हा शास्त्रीय संगीताचा असा महोत्सव जगात कोठेही नाही याची प्रचिती आली.

वझे म्हणाले, गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षांत सेवा करण्याची लाभलेली संधी ही किराणा घराण्याची पुण्याई आहे. आकाशवाणीमध्ये रूजू होत असताना गुरुजींचे मार्गदर्शन लाभणार नाही म्हणून मी नाराज झालो. पण, ‘तुझा डोका चालवं ना, काही अडलं तर मी आहेच की’, असे पारसी मिश्रीत मराठीमध्ये सांगून गुरुजींनी धीर दिला. २००८ मध्ये मी या महोत्सवामध्ये पहिल्यांदा गायलो होतो. पुढील वर्षी ‘स्वाईन फ्लू’मुळे डिसेंबरऐवजी जानेवारीमध्ये महोत्सव झाला होता. पं. फिरोज दस्तूर आणि गंगुबाई हनगल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी झालेल्या महोत्सवात माझे गायन झाले होते.

महोत्सवाची नांदी

ज्येष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदा गिरीश संझगिरी यांच्या गायनाने बुधवारी (११ डिसेंबर) ६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची नांदी होणार आहे. तर, रविवारी (१५ डिसेंबर) चंद्रशेखर वझे यांच्या गायनाची मैफील होणार आहे.