ज्या महोत्सवात मी बालपणापासून येत आहे, त्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये कला सादर करावी हे माझे स्वप्न गुरुवारी (१० डिसेंबर) पूर्ण होत आहे. सवाईच्या स्वरमंचावर योग्य वेळी मिळालेली संधी हा माझ्यासाठी भाग्ययोगच आहे, अशी भावना युवा शहनाईवादक नम्रता गायकवाड हिने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. महोत्सवाची महती जाणून असल्याने या संधीचा एका बाजूला आनंद असला, तरी या स्वरमंचावरून वादन करण्याचे एक दडपणही मनावर आहे, असे सांगितले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे गुरुवारपासून (१० डिसेंबर) सुरू होत असलेल्या ६३ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा श्रीगणेशा करण्याची संधी नम्रताला लाभली आहे. मंगल वाद्याने महोत्सवाचा प्रारंभ करण्याची मंडळाची प्रथा यंदा नम्रताच्या शहनाईवादनाने सुरू होत आहे. महोत्सवाच्या स्वरमंचावरून शहनाईवादन करणारी पहिली महिला असा मानही तिच्या शिरपेचात रोवला जाणार आहे. आपल्या वादनातून बनारस घराण्याचा बाज सादर करीत रसिकांना आनंद देण्याचा प्रयत्न करेन, असे नम्रताने सांगितले.
गायकवाड घराण्याबरोबरच नम्रताला मातुल घराण्याकडूनही शहनाईवादनाची परंपरा लाभली आहे. नम्रता ही सनईवादनाची परंपरा लाभलेल्या गायकवाड घराण्यातील पाचव्या पिढीची तर, सवाईच्या स्वरमंचावरून कलाविष्कार करणारी चौथ्या पिढीची कलाकार ठरली आहे. सनईसम्राट शंकरराव गायकवाड, प्रभाशंकर गायकवाड आणि प्रमोद गायकवाड यांच्यानंतर केवळ २१ व्या वर्षीच नम्रता हिला या स्वरमंचावरून स्वतंत्र कलाविष्कार घडविण्याची संधी लाभली आहे. स्कॉटलंड येथील तबलावादक हरदीप दिढे तिला साथसंगत करणार आहे. भारती विद्यापीठातून शहनाई हा विषय घेऊन तिने पदवी संपादन केली असून आता ती एम.ए. करीत आहे. आई सीमा गायकवाड ही माझी पहिली गुरू. तिनेच शहनाई या वाद्याची गोडी लावली. माझे आजोबा पं. अनंतलाल यांच्याकडून तिने शहनाईवादनाचे शिक्षण घेतले. त्यामुळे माझ्याही वादनामध्ये बनारस घराण्याचा बाज आहे. वडील डॉ. प्रमोद गायकवाड यांच्यासह संजीव शंकर, अश्विनी शंकर आणि आनंद शंकर या भावंडांना सहवादनाची साथ केली आहे.
सुषिर वाद्याचे वादन करताना मोठा दमसास लागतो. महाराष्ट्रातील सनई आणि बनारसमधील शहनाई हे वाद्य जागतिक दर्जाचे आहे. ते वाजविणे अवघड आहे. मात्र, हे वाद्य वाजविण्याचा मुलींनी प्रयत्न करायला हवा. या प्रयत्नातूनच सनई आणि शहनाईवादक महिला कलाकार मिळू शकतील, असा विश्वासही नम्रताने व्यक्त केला.