अभिजात भारतीय संगीत नव्या पिढीतील संगीतप्रेमींसाठी पोहोचवण्यासाठी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजक आर्य संगीत प्रसारक मंडळाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वेबकास्ट्रिमिंगच्या माध्यमातून हा स्वरोत्सव पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात जगभरातील रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इंडियन मॅजिक आयचे संचालक हृषीकेश देशपांडे आणि राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते. मंडळाने घेतलेल्या पुढाकाराची निर्मिती आणि व्यवस्थापन अमेरिकास्थित म्युझिक ऑन फायरसह इंडियन मॅजिक आय सांभाळत आहे.
६२ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील १५ तासांचे वेब कॅप्सूल हाय डेफिनेशन (एचडी) प्रकारात जगभरातील संगीतप्रेमींना उपलब्ध होणार आहे. त्यासाठी त्यांना ठरावीक कालावधीसाठी ५० डॉलर मोजावे लागणार आहेत. महोत्सवातील कोणताही एखादा दिवस किंवा एखाद्या कलाकाराच्या पूर्ण सादरीकरणाचा आस्वाद घेण्याचाही पर्याय संगीतप्रेमींना निवडता येणार आहे. त्यासाठी १० डॉलर किंमत मोजावी लागेल. त्यासाठी १५ जानेवारीपासून नोंदणी करता येणार असून musiqui.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये हे वेबस्ट्रिमिंग केले जाणार आहे. शुल्क भरल्यानंतर ठरावीक कालावधीत संगीतप्रेमी रसिक ते वेबस्ट्रिमिंग एकदा पाहू शकतो. तुकडय़ा-तुकडय़ाने पाहू शकतो किंवा वारंवार देखील पाहू शकतो. प्रसिद्ध पाश्र्वगायक सोनू निगम याचा प्रस्तुतकर्ता म्हणून असलेला सहभाग हे पहिल्यावहिल्या वेबस्ट्रिमिंगचे वैशिष्टय़ आहे. उत्तर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड या देशांमध्ये अभिजात संगीताचे चाहते मोठय़ा प्रमाणावर आहेत. या देशांतील संगीतप्रेमींना या आधुनिक माध्यमाद्वारे सवाई महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. ‘कलर्स’ वाहिनीने या वेबस्ट्रिमिंगचे सहा भागांच्या माध्यमातून प्रमोशन करण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती राजेश देशमुख यांनी दिली.
महोत्सवात सहभागी होणाऱ्या बुजुर्ग कलाकारांपासून ते उदयोन्मुख कलाकारांनीही या आधुनिक माध्यमाद्वारे संगीत जगभरात नेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या प्रयत्नाला व्यावसायिकदृष्टय़ा यश कितपत मिळेल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, हा प्रयोग यशस्वी झाला, तर कलाकारांना रॉयल्टी देण्यात येणार असल्याचे हृषीकेश देशपांडे यांनी सांगितले.