सवाई गंधर्व सोहळ्याचा आजचा चौथा दिवस पं. शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाने सुरू झाला. सर्वप्रथम राग ‘शिवमत भैरव’ विलंबित झुमरा या तालात सादर केला. स्वरसंवादिनी पं. सुधीर नायक, तर तबल्यावर श्री. मंगेश मुळे होते. श्रुतींवर सत्यजित बेडेकर, राज शहा होते. पखवाजवर ज्ञानेश्वर दुधाडे होते. ‘डार डार तूही समाये’ ही चीज अतिशय सुरेख बांधलेली. रागाची मांडणी उत्तम, गमकेच्या अंगाने ताना, सरगमची तर्कसंगत आलापी गायनामधील शिस्त जाणवत होती. मध्य त्रितालात ‘आज मौजूद वही’ ही चीज नजाकतीनं गायली. यानंतर ‘देवगंधार’ या रागामधील ‘बलजोरी ना करो रे कन्हाई’ ही बंदिश खूपच रंगली. दमसास उत्तम असल्यामुळे रागामधील स्वर टपोरे दाणेदार होते. अंतऱ्यामधील ‘पुकार’ अंत:करणाला भिडत होती. ‘जौनपुरी’ रागामधील ‘छेडो ना कासे’ ही बंदिशपण विक्रमी प्रतिसाद देऊन गेली.
कुठल्या एका मुशीत बांधता यावे असे हे गाणे नव्हते. हा गानप्रकार चांगला म्हणावा तर, दुसरी तान प्रक्रिया वेगळेच सौंदर्य घेऊन समोर येत होती. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या ‘पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे’ या ओवीनुसार श्रोत्यांची अवस्था झाली होती. असे हे व्यापक गाणे होते. शेवटी ‘घेई छंद मकरंद’ हे नाटय़गीत आणि ‘आधी रचिली पंढरी’ हा संत नामदेवांचा अभंग खूपच मोठी दाद घेऊन गेला. टाळवादक माउली टाकळकर यांना गुरुदक्षिणा म्हणून पं. शौनकजींनी निवृत्तिवेतन जाहीर केले. हा आणखी एक ‘पारियाचा रवा’, कसा उचलायचा? सांगा.
यानंतर पं. ध्रुव घोष यांचे सारंगीवादन झाले. पंडितजी ध्रुव हे तालसम्राट पं. निखिल घोष यांचे सुपुत्र, तर प्रसिद्ध बासरीवादक पं. पन्नालाल घोष यांचे पुतणे. पन्नाबाबूजी आत्ताच्या पिढीने पाहिले नाहीत. त्यांच्या पुतण्याच्या दर्शनाने व सारंगीच्या वादन श्रवणाचे हे अंशत: समाधानही कमी नाही. सारंगीमधून शंभर प्रकारचे रंग (मनोभाव) दाखविता येतात म्हणून यास ‘सौरंगी’ म्हणत. स्वरांचा सूक्ष्मतम आविष्कार या वाद्यामधून निघतो. आदरणीय अब्दुल करीम खाँ हे आधी सारंगीये होते. नंतर ते गायनाकडे वळले. हृदयाला भिडणारा त्यांचा स्वर हा सारंगीच्या प्रचंड रियाजाचा परिपाक होता. किराणा घराण्याच्या या महाकाय वटवृक्षाच्या बीजाचे नाव काय? तर ते आहे, ही सारंगी! असे म्हटल्यास वावगे न ठरावे. ‘मिया की तोडी’ या रागामधील गत त्यांनी विलंबित एकतालात रसपूर्ण सादर केली. गाण्यामधील शब्द सोडले तर बाकी सर्व आलाप, खटक्या, मुरक्या, मिंड, सूंथ, घसीट, जमजमा स्थायी, बेहेलावे आरोही, अवरोही, संचारी, वर्ण, ताना, तंत अंग या सर्वाचा समावेश त्यांच्या वादनात होता. बंदिशीचे शब्द राहिले होते तेही त्यांनी बंदिश गावून दाखविले.
शेवटी आदरणीय करीम खाँसाहेब यांची अजरामर ‘जोगिया’ रागातील बंदिश ‘पिया के मिलन की आस’ खूपच आर्त स्वरांनी मनातील विरह व्यथा व्यक्त करीत होती. ‘शब्दावाचून कळले सारे, शब्दाच्या पलिकडले’ अशा मूक भावना रसिकांनी टाळ्या वाजवून या ध्रुवताऱ्यासमोर व्यक्त केल्या. पं. रामदास पळसुले यांनी सुरेख साथसंगत केली.
सकाळच्या सत्राच्या शेवटी विदूषी मालिनी राजूरकर यांचे दर्जेदार गायन झाले. सुरुवातीस त्यांनी ‘चारुकेशी’ मध्ये विलंबित तिलवाडय़ात ‘बालमा परदेस गयो’ ही, तर ‘मारो मन डोर’ ही त्रितालात बंदिश सादर केली. तालाच्या अंगाने, विविध मुरक्यांनी सादर केली. अनाघाताने सम दाखवायची त्यांची पद्धत रागसौंदर्य वाढवित होती. एकसंध आलापांचे सादरीकरण, गायनामधील सहजता वाखाणण्याजोगी होती. यानंतर ‘गौड सारंग’ या रागामधील ‘छेडो ना िनद मोरी’ ही बंदिश मोठय़ा नजाकतीने सादर केली. शेवटी ‘पन घट जल भरने कैसे जाऊ’, ही भैरवी अर्थवाही बोलतानांनी सादर केली. असे हे सुंदर गायन संपूच नये असे वाटत होते. अशा जड अंत:करणाने रसिक श्रोत्यांनी हा स्वर दरबार सोडला.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”