पुण्यातील प्रतिष्ठित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला यंदा रमणबाग शाळेचे मैदान नाकारल्यानंतर हा महोत्सव आता १२ ते १६ डिसेंबर या काळात मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव गेली बत्तीस वर्षे शनिवार पेठेतील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे होत असे. यंदा सोसायटीने शाळेची जागा महोत्सवासाठी देता येणार नाही, असे लेखी पत्र दिल्यामुळे जागेतील हा बदल करण्यात आला असल्याचे जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे मान्य केले, याबद्दल जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

हा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली पासष्ट वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वास श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.