• उद्योगनगरीत राजकीय आयोजकांची ‘चमकोगिरी’; लाखो रूपयांची उधळपट्टी
  • भोसरीत ‘आर्ची’ला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत तुंबळ हाणामारी

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बहुतांश मंडळांनी, तसेच ‘राजकीय’ आयोजकांनी दहीहंडीचा उत्सव दणक्यात ‘साजरा’ केला. उशिरा रात्रीपर्यंत शहरभरात दहीहंडीचा जल्लोष सुरू होता. ध्वनिक्षेपकाची मर्यादा, रात्री दहाचे बंधन अशा नियमांचीही ‘ऐसी तैसी’ करण्यात आली. लाखो रूपयांची ‘सुपारी’ घेऊन सिने तारकांनी लावलेली हजेरी, त्यांना पाहण्यासाठी झालेली गर्दी व लाखोंची उधळपट्टी हेच उद्योगनगरीतील दहीहंडीचे ‘वैशिष्टय़’ होते. भोसरीत आर्चीला पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीत प्रेक्षकांमध्ये चपलेने आणि लाथाबुक्क्य़ांनी तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.

भोसरीत रात्री साडेनऊच्या सुमारास ‘सैराट’च्या टीमचे आगमन झाले. जेमतेम १५ मिनिटे तिथे असलेल्या या कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. पुलावर, रस्त्यांवर, गच्चीवर नागरिक उभे होते. १५ हून अधिक बाऊन्सर, पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचा ताफा असताना िरकूला व परशाला पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी चढाओढ सुरू होती. त्यातून व्यासपीठावर वादावादी व धक्काबुक्की झाली. त्याचवेळी खाली प्रेक्षकांमध्ये सुरूवातीला ढकलाढकली झाली, त्याचे पर्यावसन तुफान हाणामारीत झाले. नागरिक एकमेकांना लाथाबुक्क्य़ांनी मारहाण करत होते. काहींनी एकमेकांना चपलांनी मारहाण केली. कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला, तेव्हा गोंधळच सुरू होता. कलाकारांची ‘निर्धारित’ वेळ संपल्याने ते निघून गेले आणि थोडय़ाच वेळात वातावरण निवळले.

सहा महिन्यांवर होणाऱ्या िपपरी महापालिकांच्या निवडणुकांमुळे यंदाच्या दहीहंडी आयोजकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली होती. नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्तेच आयोजक असल्याने त्यांनी दहीहंडीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा करून घेत ‘चमकोगिरी’ करण्याची संधी सोडली नाही. वाकड, सांगवी, दापोडी, भोसरी, प्राधिकरण, चिंचवड, िपपळे सौदागर आदी भागात मोठय़ा दहीहंडय़ा होत्या. संततुकारामनगर येथे महिलांची दहीहंडी लावण्यात आली. दिवसभर तयारीत गेल्यानंतर सायंकाळी सातनंतर गोविदांनी खऱ्या अर्थाने थर लावण्यास सुरूवात केली. डीजेच्या आवाजात तरूणाईने मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. ढोल-ताशा पथकांनी रंगत आणली. काहींनी पारंपरिक व न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडी साजरी केली. तर, काहींनी उत्साहाच्या भरात नियमांची ऐसीतैसी केली. शहरभरात जागोजागी असलेल्या दहीहंडीसाठी मालिका, नाटक तसेच चित्रपटांमधील नायिकांनी हजेरी लावली. त्यांच्या ‘सुपारी’साठी लाखो रूपये खर्ची झाले. दहीहंडीसाठी रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती.