विद्युत व्यवस्थेसाठी महापालिकेने शहरात उभारलेल्या ८० विद्युत खांबांवरून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात उभारण्यात आलेल्या वायरलेस कंट्रोल स्ट्रीट लाईट सिस्टिम अंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘स्काडा’ यंत्रणेमुळे ही बाब पुढे आली असून वीज चोरी होणारी ठिकाणे महापालिकेने शोधून काढली असून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सर्वाधिक १० ठिकाणी चोरी होत असल्याचेही दिसून आले आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून शहरात विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी लायटिंग प्रकल्पाअंतर्गत खासगी-सार्वजनिक भागीदारी (प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशीप- पीपीपी) या तत्त्वावर जुने दिवे बदलण्यात आले असून त्याऐवजी ८० हजार एलईडी दिवे वेगवेगळ्या भागांत बसविण्यात आले आहेत. या दिव्यांचे नियंत्रण सुपरव्हिजरी कंट्रोल अ‍ॅण्ड डाटा अ‍ॅक्विझिशन (स्काडा) या यंत्रणेद्वारे होत आहे. या यंत्रणेचा नियंत्रण कक्ष सिंहगड रस्त्यावरील स्मार्ट सिटीच्या कक्षात असून याद्वारे महापालिकेकडून विद्युत दिव्यांचे नियंत्रण केले जात आहे. या दिव्यांचे नियंत्रण करत असताना ही वीज चोरी उघडकीस आली आहे.

स्मार्ट सिटीतील नियंत्रण कक्षाद्वारे वीज चोरी होणारी ८० हून अधिक ठिकाणे निश्चित करण्यात आली. एलईडी दिव्यांचा वापर होत असताना नियमित वापरापेक्षा जास्त वापर होत असल्याचे नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आले.

वापर कशामुळे वाढला, याची तपासणी करत असताना वीज चोरी होत असल्याचे पुढे आले. त्यानुसार ही ठिकाणे निश्चित करण्यात आली असून वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय वीज चोरीच्या घटना

ढोले रस्ता- ३, नगर रस्ता- ४, येरवडा- ६, औंध- ३, धनकवडी- ४, सिंहगड रस्ता- ६, कर्वेनगर- ४, हडपसर- ८, कोंढवा- १, बिबवेवाडी- ६, कसबा- ९, कोथरूड-  १०, शिवाजीनगर- ४, वानवडी-  ६