देवदासींना उपेक्षित म्हणून हिणवले जाते. परंतु आपल्याच सामाजिक परंपरेने देवदासी आणि तृतीयपंथीयांना मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. संतपदी जाण्याचे भाग्य देखील त्यांना मिळाल्याचे इतिहासात दिसते. परंतु आज देवदासींच्या प्रथेला विकृत स्वरुप मिळत आहे. योग्य ते काम मिळाल्यास त्यांना देहविक्री करावी लागणार नाही. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांच्यासाठी केले जात आहे. त्याबाबत समाजात जागरुकता देखील निर्माण होत आहे. या कामाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम विलास चाफेकर यांनी केले आहे, अशा शब्दांत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी चाफेकर यांच्या कार्याचा गौरव केला.
समस्त बुधवार पेठ भगिनी, तृतीयपंथी आणि आशीर्वाद संस्थेतर्फे जाणीव संघटना आणि वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी डॉ. देखणे बोलत होते. महापौर प्रशांत जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मल्रेचा, तसेच मीना कुल्रेकर, सुनीता जोगळेकर, कायाकल्पच्या सीमा वाघमोडे, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. देखणे म्हणाले की, देहविक्री करणाऱ्या महिलांचे विश्व हे प्रत्यक्षात वेगळे असते. त्यातील न दिसणारे वास्तव विलास चाफेकर यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून समोर आणले आणि खऱ्या अर्थाने या महिलांना त्यांची ओळख झाली. त्यांनी माणसापलीकडची माणसे शोधली आणि त्यांची खऱ्या अर्थाने पूजा केली. अंधारातले कवडसे कोणालाच दिसत नाहीत, त्यांना उजेडात आणण्याचे काम चाफेकर यांनी त्यांच्या कार्यातून केले आहे.महापौर प्रशांत जगताप म्हणाले की, समाजात खूप कमी लोक असे आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील लोकांसाठी वाहून घेतले आहे.
सत्काराला उत्तर देताना चाफेकर म्हणाले की, ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्यातर्फे सत्कार होणे ही आनंदाची गोष्ट आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांना अगतिक होऊन ज्या दिवशी या क्षेत्रात यावे लागणार नाही, त्याच दिवशी माझ्या कामाचे सार्थक होईल. व्यवसाय कोणताही असला तरी समाजात वावरताना या महिला देखील प्रतिष्ठित आहेत, त्यांना सन्मानानेच वागविले पाहिजे. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.