शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलण्याबरोबरच शिक्षण विभागाने परीक्षेचे शुल्कही वाढवले आहे. मात्र हे सगळे बदल करताना शिष्यवृत्तीची रक्कम मात्र अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार असल्याचेही परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावर्षीपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात शिक्षण विभागाने बदल केले. आतापर्यंत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. यावर्षीपासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होणार आहे. दरवर्षी मार्चमध्ये ही परीक्षा होत होती.

आता यावर्षीपासून फेब्रुवारीमध्येच परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरूपात झालेल्या बदलांबरोबरच शिक्षण विभागाने परीक्षेच्या शुल्कातही वाढ केली आहे. यापूर्वी परीक्षेसाठी ४० रुपये शुल्क घेण्यात येत होते ते आता ८० रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निशुल्क होती त्यांच्यासाठी २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शाळांनी भरायच्या नोंदणीशुल्कातही वाढ झाली आहे. शाळांना आता १०० रुपयांऐवजी २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

परीक्षा आणि नोंदणीचे शुल्क वाढले तरीही शिष्यवृत्तीच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आलेली नाही. आतापर्यंत चौथीसाठी १०० रुपये महिना तर सातवीसाठी १५० रुपये महिना शिष्यवृत्ती देण्यात येत होती. ही रक्कम वाढवून पाचवीसाठी ५०० रुपये आणि आठवीसाठी ७५० रुपये करण्यात यावी असा प्रस्ताव परीक्षा परिषदेने शासनाकडे पाठवला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

४० टक्क्य़ांपेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी अपात्र

पूर्वी शिष्यवृत्तीस पात्र, उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा तीन विभागांमध्ये विद्यार्थ्यांची वर्गवारी करण्यात येत असे. आता नव्या नियमानुसार पात्र किंवा अपात्र अशा दोनच गटांत वर्गवारी होणार आहे. या परीक्षेत प्रत्येक विषयांत ४० टक्क्य़ांपेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव हा जिल्ह्य़ाच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.