पुण्यातील इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांमध्ये पहिली आणि केजीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यामुळे शाळेत आता प्रवेश घ्यावा की नाही, याबाबत आता पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
डिसेंबर महिन्यात शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबवू नये असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने देऊनही पुण्यातील अनेक शाळांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पालकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. शाळेत आताच प्रवेश घेतला आणि तो अनधिकृत ठरवला तर, प्रवेश घेतला नाही आणि नंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन आपल्या मुलाला प्रवेश मिळालाच नाही तर, अशा अनेक प्रश्नांनी पालकांची झोप उडवली आहे. शिक्षण विभागाची भूमिका पटत असूनही नंतर हव्या त्या शाळेत प्रवेशच मिळाला नाही तर या चिंतेमुळे अनेक पालक प्रवेश अर्ज घेत आहेत. अनेक शाळांच्या संकेतस्थळांवर प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचे नमूद करून प्रवेशअर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पालकांच्या गोंधळात अजून भर पडली आहे.
याबाबत शर्मिला आढाव या पालकांनी सांगितले, ‘‘माझ्या मुलाला प्रवेश घ्यायचा आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निर्णयामुळे मी थांबले होते. मात्र, आमचे प्राधान्य असलेल्या शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पण आता प्रवेश घेऊन तो नंतर रद्द झाला, तर काय करणार किंवा आता घेतला नाही आणि नंतर मिळाला नाही तर मुलाचे नुकसान होणार.’’
‘‘शाळांनी आता प्रवेश प्रक्रिया करू नयेत. याबाबत शाळांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, ज्या शाळा आता प्रवेश प्रक्रिया राबवत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रवेश रद्द ठरवण्यात येतील. त्यामुळे पालकांनीही प्रवेश घेऊ नयेत.’’
– मुस्ताक शेख, अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ