हजारो पालक दुसऱ्या फेरीच्या प्रतीक्षेत

शाळा सुरू होण्यापूर्वी पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश पूर्ण करण्याच्या शिक्षण विभागाच्या घोषणा यावर्षीही हवेतच विरल्या आहेत. पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची महिन्याभरापासून सुरू असलेली पहिली फेरी अद्यापही पुढे सरकलेली नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो पालक सध्या दुसऱ्या प्रवेश फेरीच्या प्रतीक्षेत आहेत.

शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के राखीव जागांवर दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. गेल्यावर्षी या जागांवरील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पालकांचा शिक्षण विभागाने विश्वासघात केला. प्रवेश प्रक्रिया अर्धवटच सोडून दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. शाळेचे अर्धे वर्ष संपले तरी सुरू राहणारी पंचवीस टक्क्यांची प्रवेश प्रक्रिया पालक आणि शाळांसाठीही गेली काही वर्षे डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे यावर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली होती. मात्र शाळा सुरू होण्यासाठी आठवडा राहिला तरीही प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरीही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही शिक्षण विभागावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांना मनस्तापालाच सामोरे जावे लागत आहे.

मुळातच यावर्षी देखील पंचवीस टक्क्यांची प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. त्यानंतर तांत्रिक अडचणी आणि शाळांच्या मुजोरीला तोंड देत ही प्रक्रिया रडतखडत पुढे सरकत आहे. यावर्षी साधारण १८ हजार पालकांनी पंचवीस टक्क्यांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अर्ज भरले आहेत. त्यापैकी साधारण ९ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत शाळा देण्यात आल्या. उरलेले प्रवेश दुसऱ्या फेरीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. पहिल्या फेरीत आतापर्यंत ६ हजार ४० विद्यार्थ्यांनी शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. पहिल्या फेरीसाठी २ मे रोजी सोडत काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश देण्यासाठी आातापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही प्रवेश प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. पहिली फेरी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीची सोडत, त्याचे प्रत्यक्ष प्रवेश आणि त्यानंतर आवश्यकता असल्यास तिसरी फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पालकांमध्ये अस्वस्थता आहे.

‘पहिली फेरी झाली आहे. काही शाळांनी संगणक प्रणालीवर झालेल्या प्रवेशाची नोंद केलेली नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या फेरीचे नियोजन जाहीर करण्यात येईल. शाळा सुरू होण्याआधी दुसरी फेरी घेण्यात येणार आहे.’’

– मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा