५९९ ग्रंथालयांचा सहभाग

शासकीय अनुदान मिळणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालयांना पुनर्जीवित करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांकडून शाळा दत्तक घेण्याची मोहीम पुणे जिल्हा आणि पुणे विभागात गेले वर्षभर राबविण्यात आली. त्या अंतर्गत पुणे विभागातील तब्बल ६९ हजार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचली असून, योजनेमध्ये ५९९ ग्रंथालयांनी सहभाग नोंदविला. भारताचे ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही योजना १२ ऑगस्ट २०१७ पासून सुरू करण्यात आली होती.

अपुरे मनुष्यबळ, केवळ अनुदानासाठी सुरू करण्यात येणारी ग्रंथालये अशा अनेक कारणांमुळे सार्वजनिक ग्रंथालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्हय़ात वर्षभरापासून ग्रंथालयांनी शाळा दत्तक घेण्याची योजना राबवली. या योजनेंतर्गत ३५७ ग्रंथालये, तीन हजार शिक्षकांनी सहभाग घेत ४० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवली होती. या योजनेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याने या मोहिमेचा सोलापूर पॅटर्न पुणे जिल्हय़ातही राबवला. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना द्विभाषिक, शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी मदतशील, सामान्यज्ञान वाढवण्यासाठीची पुस्तके दिली. पुणे ५६५, सातारा ३९५, कोल्हापूर ६८५, सांगली ३७७ आणि सोलापूर ९४७ अशी एकूण २ हजार ९६९ ग्रंथालये पुणे विभागात असून तेथे ही योजना कार्यान्वित केल्याची माहिती सहायक ग्रंथालय संचालक द. आ. क्षीरसागर यांनी दिली.

ग्रंथालयांनी केलेली कामे

सार्वजनिक ग्रंथालयांनी आपल्या परिसरातील दत्तक घेण्यायोग्य प्राथमिक, माध्यमिक शाळेची निवड केली. शाळेच्या मुख्याध्यापकांना योजनेची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थी, शिक्षकांना सभासद करून घेतले, विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटास सुसंगत बालवाङ्मय, कुमारवाङ्मय उपलब्ध करून देण्यात आले, दर आठवडय़ाला नियमितपणे शाळेत जाऊन मुलांना पुस्तके बदलून दिली. तसेच दर चार महिन्यांनी मुलांची वाचन प्रगती व वाचनविषयक आवड या बाबत शिक्षकांकडून अभिप्राय घेण्यात आला.

शाळा दत्तक उपक्रम १२ ऑगस्ट २०१७ पासून सुरू झाला असून उपक्रम पूर्णत: ऐच्छिक असल्याने उपक्रमासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त अनुदान देण्यात आले नाही. तरीदेखील पुणे विभागातील दोन हजार ९६५ सार्वजनिक ग्रंथालयांपैकी ५९९ ग्रंथालयांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून ६९ हजार शालेय मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवली आहेत.

द. आ. क्षीरसागर, सहायक ग्रंथालय संचालक