दप्तराच्या ओझ्याने बालपण दडपू पाहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मुक्तता करण्यासाठी शास्त्रशुद्ध आणि आरोग्यदायी स्कूल बॅगची निर्मिती करण्यात आली आहे. दप्तराच्या ओझ्याने पाठदुखी, मानदुखी आणि येणारा थकवा यापासून मुलांची सुटका करणारी ही अशा प्रकारची देशातील पहिली स्कूल बॅग असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
सोलापूर येथील क्रिएटिव्ह बॅग्जचे आनंद झाड यांनी या स्कूल बॅगविषयीची माहिती दिली. सुमारे आठ किलो वजन पेलण्याची क्षमता असलेली ही बॅग पाठीवर घेतल्यानंतर वजनामध्ये २० टक्के घट जाणवते. तसेच ही बॅग वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य असल्याचा अभिप्राय अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश मेतन यांनी दिला असल्याचेही आनंद झाड यांनी सांगितले. पाठीवर हलके वाटणे, सेल्फ स्टँडिंग मेकॅनिझम, सायंटिफिक बॅक पॅिडग, एअर फ्लो सिस्टिम या तांत्रिक सुविधांबाबत स्वामित्व हक्क मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे आनंद झाड यांनी सांगितले.
चीन आणि दक्षिण आफ्रिका येथील स्कूल बॅगमध्ये असलेल्या वैज्ञानिक तंत्राची माहिती घेऊन दीड वर्षांच्या अभ्यासानंतर भारतीय बनावटीची स्कूल बॅग निर्माण करण्यात आली आहे. ही स्कूल बॅग सोलर पॉवर सीरिजमध्ये बनविली आहे. बॅगेच्या पुढील बाजूस सोलर फ्लेक्झिबल पॅनेल बसविण्यात आले आहे. मागील कप्प्यामध्ये सोलरवर चार्ज होणारे १५०० एम. एच. बॅटरी असलेले पॉवर बँक लावण्यात आले आहे. ७ ते ८ तास उन्हात ठेवली तर या बॅटरीमध्ये ५ ते ६ तासांच्या बॅकअप क्षमतेची ऊर्जा साठवून ठेवता येते. या बॅटरी बॅकअपवर मोबाइल चार्जिगसह छोटय़ा बॅटरीवर चालणाऱ्या उपकरणांनाही चार्जिग करता येईल. याशिवाय बॅगमध्येच १२ एलईडी दिवे असलेला टेबल लॅम्पही देण्यात आला असून हा लॅम्प एका पूर्ण चार्ज पॉवर बँक बॅकअपवर ५ ते ६ तास चालू शकतो. बॅगमधील सोलर यंत्रणा भिजून खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ कप्पा करण्यात आला आहे. तर, संपूर्ण बॅगेसाठी स्वतंत्र रेन कव्हरही दिला असल्याचे आनंद झाड यांनी सांगितले.