शासनाने नियमाचा आधार देऊन आणि कारवाईचा धाक दाखवून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले खरे. मात्र, जाहिरातबाजीसाठी वेगवेगळ्या परीक्षा, परदेशी भाषा आणि अभ्यासक्रमाबाहेरील विषय बंधनकारक करून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे ओझे मात्र शाळांनीच वाढवले आहे. नियमित अभ्यासक्रमाच्या चार ते पाच विषयांच्या जोडीला पूरक विषय म्हणून अनेक शाळांमध्ये अधिक दोन-तीन विषय बंधनकारक करण्यात येत आहेत. अगदी पूर्वप्राथमिकच्या वर्गातील विद्यार्थीही त्याला अपवाद नाहीत.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या वजनावर सर्वच स्तरातून अनेक वर्षे टीका झाल्यानंतर शासनाने नियम करून पाठीवरील ओझे कमी केले. विद्यार्थ्यांना शाळेत न्याव्या लागणाऱ्या दप्तराचे वजन किती असावे, याबाबत शासनाने नियमावलीच जाहीर केली. त्यानुसार अनेक शाळांनीही पुढाकार घेत दप्तराचे वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले. मात्र, त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील विषयांचे वजन मात्र शाळांनीच वाढवले आहे.
शिक्षणाच्या वाढलेल्या पसाऱ्याने शाळांची संख्या अफाट वाढवली. साहजिकच शाळांमधील स्पर्धाही वाढली. आपले वेगळेपण दाखवून देण्यासाठी शाळांनी स्वत:च अभ्यासक्रमाबाहेरील विषयांचे शिक्षण देण्याची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळांनी हे विषय बंधनकारकही केले आहेत. पूर्वप्राथमिकच्या वर्गापासूनच संस्कृत भाषेचे शिक्षण, परदेशी भाषांचे शिक्षण, वैदिक गणिताची ओळख, नृत्य, चित्रकला, कॅलिग्राफी यापैकी एखादा विषय, योगा, पोहणे, स्केटिंग यांसारखे विषय शाळांमध्ये बंधनकारक करण्यात आले आहेत. पहिली ते चौथीच्या वर्गासाठी नियमित तीन किंवा चार विषयांबरोबर अनेक शाळांनी आपणहून तीन ते चार जादा विषय बंधनकारक केले आहेत. याशिवाय अनेक शाळा प्राथमिक वर्गासाठी अॅबॅकस, वैदिक गणित काही संस्थांच्या चित्रकला स्पर्धा, चाचण्या बंधनकारक करत आहेत. या बंधनकारक विषयांचे शुल्कही शाळा वेगळे घेतात. केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांबरोबरच राज्य मंडळाच्या शाळाही यात आघाडीवर आहेत. या अधिक विषयांसाठी आणि परीक्षांच्या तयारीसाठी शाळाही अधिक वेळ चालवल्या जातात. स्पर्धेत आपलेच मूल आघाडीवर असावे या अट्टहासाने पालकही शाळांच्या ‘वेगळेपणाला’ भुलत आहेत.
‘मुले वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत अनेक गोष्टी पटकन शिकतात. त्यातच त्यांचा कलही कळू शकतो. त्यामुळे या वयोगटातील मुलांना नव्या विषयांची आम्ही ओळख करून देतो. प्रत्येक विद्यार्थ्यांला एखादी कला आणि खेळ यावा यासाठी या विषयांचे शिक्षण दिले जाते,’ असे एका शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितले.

‘‘अभ्यासक्रमांत भाषांचा लेखी भाग असू नये. मात्र, लहान वयातच पाठांतर होत असते. त्यामुळे भाषा कानावरून जाणे चांगलेच असते. मुलांना गुंतवून ठेवण्यासाठीही नवे उपक्रम करणे योग्यच. मात्र, शाळेत सर्व प्रकारची मुले असतात, ते लक्षात घेऊन त्याची आखणी करावी. त्याचप्रमाणे लहान मुले साधारण १५ ते २० मिनिटांसाठीच एखाद्या विषयांत गुंतू शकतात. त्याचा विचार व्हायला हवा. विषय बंधनकारक करण्यात आले आणि त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेतली मजा हरवली तर मुलांना लहानपणापासूनच अभ्यास आवडेनासा होतो. त्याचप्रमाणे शाळेत नवे विषय शिकवताना इतर मुलांशी तुलना केली जाणार नाही, विद्यार्थ्यांंना अभ्यासाचा किंवा गृहपाठाचा ताण येणार नाही याची काळजी शाळा आणि पालकांनी घ्यायला हवी. त्यासाठी लहान मुलांच्या शाळांमध्ये चांगले प्रशिक्षितच शिक्षक असावेत.’’
– निलिमा किराणे, बाल मानसशास्त्राच्या अभ्यासिका

‘‘मुलांना सगळं आलंच पाहिजे हा पालकांचा हट्ट असतो आणि त्याचा फायदा करून घेण्याचा काही शाळांकडून प्रयत्न केला जातो. प्रत्येक मुलामध्ये गुण असतातच पण मुलांनी चांगले आणि खूप शिकावे, म्हणजे नेमके काय याचा विचार पालकांनी केला पाहिजे. मुलांना सगळं आलंच पाहिजे यातून शिकवण्याचाही अतिरेक झाला, तर त्याचा परिणाम चांगला होण्याऐवजी वाईट होऊ शकतो. कोणतेही विषय शिकताना मुलांना शिकण्यातून मिळणारा आनंद हरवणार नाही याची काळजी घ्यायला हवी. लहानपणापासूनच सगळ्या विद्या आणि कलांचे शिक्षण देणे ही शिक्षणातील एक प्रकारची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. मात्र, याचा विचार पालकांनी आणि शाळांनी करायला हवा. हे कोणतेही नियम करून बदलणार नाही.’’
– भाऊसाहेब चासकर, शिक्षक