राज्य शासनाने लागू केलेल्या स्कूलबस नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्कूलबसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूलबस चालकाला शाळेशी करार करावा लागणार आहे. मात्र, काही शाळा करार करीत नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांशी करार करता येणार असून, त्यासाठी १५ दिवसांची मुदत स्कूलबस चालकांना देण्यात आली आहे.
नवे शालेय वर्षे सुरू होणार असल्याने स्कूलबस नियमावलीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. त्या दृष्टीने नियमावलीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी शालेय विद्यार्थी वाहतूक समितीची बैठक घेण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. स्कूसबस नियमावलीतील विविध मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बहुतांश शाळांमध्ये अद्याप विद्यार्थी वाहतूक समित्यांची स्थापना झाली नसल्याच्या तक्रारींबाबतही बैठकीत चर्चा झाली.
शहरामध्ये सहा हजार ८९६ शाळा असून, त्यापैकी केवळ एक हजार ३९७ शाळांमध्येच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समित्या स्थापन करण्याबाबत ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूलबस चालकांशी काही शाळा करार करीत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे शाळा किंवा पालकांशीही करार करता येणार आहे. त्यामुळे स्कूलबस चालकांची मोठी अडचण दूर झाली आहे. करारासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, स्कूलबस नियमावलीचे पालन न करणाऱ्या स्कूलबसवर ‘आरटीओ’कडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील काळामध्ये ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे ‘आरटीओ’कडून सांगण्यात आले.