‘नैदानिक चाचण्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही परीक्षा घेण्याची शाळांना सक्ती नाही,’ असे शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाचण्या आणि नियमित परीक्षा अशा दुहेरी ओझ्यातून विद्यार्थ्यांना आणि सतत कोणत्या ना कोणत्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यातून शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या वर्षीपासून शासनाने विद्यार्थ्यांच्या क्षमतांची तपासणी करण्यासाठी नैदानिक चाचण्या सुरू केल्या. मात्र, या चाचण्या विषयानुरूप परीक्षांना पर्याय म्हणून सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये तिमाही, सहामाही अशा परीक्षा अधिक नैदानिक चाचण्या अशा दुहेरी ओझ्याला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांचाही सर्व वेळ हा कोणत्या ना कोणत्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यातच जात आहे. मात्र, तरीही शाळांकडूनच तिमाही, सहामाही परीक्षा घेणे शिक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीमध्येही शिक्षक प्रतिनिधींनी तक्रार केली होती.
याबाबत नैदानिक चाचण्या या परीक्षांना पर्याय नाहीत. मात्र, परीक्षा घेण्याची सक्ती शाळांनी करू नये, असे नंदकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘नैदानिक चाचण्या आणि शाळेच्या नियमित परीक्षा यांमध्ये फरक आहे. सातत्यपूर्ण मूल्यमापनांतर्गत शिक्षकांना परीक्षा घ्यायच्या असतील तर ते घेऊ शकतील. मात्र, या परीक्षांची सक्ती नाही. त्याचप्रमाणे कोणतीही बाहेरील संस्था शासनाच्या चाचण्या किंवा परीक्षांची सक्ती करू शकत नाही.’