शहरातील शाळा सुरू झाल्याचा आनंद आणि प्रवेशोत्सवात मुलाने केलेल्या मजेची पालकांची झिंग शाळांनी खर्चाच्या मोठय़ा याद्या देऊन दुसऱ्याच दिवशी उतरवली आहे. शाळेच्या शुल्काव्यतिरिक्त शालेय साहित्याची यादी, विशिष्टच दुकानातून ते साहित्य घेण्याचा आग्रह, सुरू होणारे विविध कार्यक्रम, दिवस यांची यादी शाळांनी पालकांच्या हाती ठेवली आहे. त्याबरोबर अर्थातच खर्चाच्या भल्यामोठय़ा रकमाही आहेतच. शाळेच्या शुल्काव्यतिरिक्त पालकांना फक्त साहित्य आणि शाळेत होणारे विविध कार्यक्रम यांच्यासाठी किमान १० हजार रुपये खर्च करावे लागत आहेत.
शहरातील बहुतेक शाळांनी शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची लूटच चालवली आहे. शाळेच्या नियमित पुस्तकांच्या बरोबरच शाळेने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या विविध उपक्रमांच्या १० ते १२ पुस्तकांची यादी पालकांच्या हाती ठेवण्यात येत आहे. विविध विषयांचे व्यवसाय, उपक्रमपुस्तिका, कवितांची पुस्तके, व्याकरणाची पुस्तके, इंग्लिश संवाद कौशल्याची पुस्तके, बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तके अशी शासनाच्या पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त अनेक पुस्तके शाळा पालक आणि मुलांवर लादत आहेत. ही सर्व पुस्तके खासगी प्रकाशकांची आहेत. पुस्तकांच्या नावाखाली पालकांकडून शुल्काव्यतिरिक्त रक्कम घेऊन विशिष्ट प्रकाशनाची पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेकडून म्हणून पुरवली जातात. पुस्तकांसाठी म्हणून शाळा अगदी २ हजारांपासून ते ५ हजारांपर्यंत रक्कम आकारत आहेत. पूर्वप्राथमिक वर्गासाठी ठराविक अभ्यासक्रम नाही. त्यामुळे शाळा जो ठरवेल तो अभ्यासक्रम अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बहुतेक शाळांनी या प्रकाशक आणि दुकानदारांशी संधान बांधले आहे. शाळाच ही पुस्तके आणि खेळ तयार करते. त्यामुळे शाळा सांगेल त्या किमतीत शाळांमधूनच पालकांना हे साहित्य खरेदी करावे लागते.
जी कथा पुस्तकांची तीच इतर साहित्याची! प्रयोग वहय़ा, नकाशा वहय़ा, चित्रकलेची वही यांमध्ये शाळा काही किरकोळ बदल करते, तर काही शाळा आपल्या संस्थेच्या नावाने स्वतंत्रपणे शालेय साहित्य छापून घेतात. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक शाळांनी शालेय साहित्याची यादी पालकांना दिली आहे. बहुतेक शाळांची काही दुकाने ठरलेली आहेत. फक्त त्याच दुकानांमध्ये शाळेने तयार केलेली पुस्तके किंवा उपक्रमाच्या वहय़ा मिळतात. मात्र, या दुकानांमध्ये फक्त आवश्यक ती पुस्तके आणि किंवा वहय़ा खरेदी करण्याचे स्वातंत्र्य पालकांना नाही. शाळेने दिलेल्या यादीतील प्रत्येक गोष्ट या दुकानांतून खरेदी करावी लागते. या सगळय़ा साहित्याचे एकत्रित पॅकेजच असते. या पॅकेजमधील एखादी गोष्ट नको असेल किंवा बाहेरील दुकानांत एखादी वस्तू कमी दरात मिळत असेल, तर ती न घेण्याची मुभा पालकांना नाही. शाळेने ठरवून दिलेल्या दुकानांत सर्व पॅकेजच खरेदी करावे लागते. ही पॅकेजेस साधारण पाच हजार रुपयांपासून सुरू होऊन २० हजार रुपयांच्या घरातही पोहोचली आहेत.

दरवर्षी रंगपेटी, कंपास बॉक्सही नवीच हवी!
दुकानांच्या पॅकेजमध्ये रंगपेटय़ा, कंपासपेटी, पेन्सिल बॉक्स, वहय़ा, पेन ड्राईव्ह, पेन अशा सर्व गोष्टी असतात. या सर्व वस्तू पालकांना दरवर्षी नव्याच घ्याव्यात असा आग्रह करण्यात येत आहे. दरवर्षी नवी रंगपेटी, कंपास बॉक्स, पेन ड्राईव्ह असे साहित्य का घ्यायचे, आदल्या वर्षी वापरलेली कंपास बॉक्स पुन्हा वापरली तर विद्यार्थ्यांचे असे कोणते शैक्षणिक नुकसान होते या प्रश्नांची उत्तरे पालकांना मिळत नाहीत. काही शाळांमध्ये तर डबा न्यायच्या पिशव्या, दप्तर, रेनकोट, स्वेटर, वॉटरबॅग हे साहित्यही विशिष्ट ब्रँडचे आणि शाळांनी ठरवलेल्या दुकानांमधूनच घेण्याची सक्ती पालकांवर करण्यात येत आहे.

उपक्रमांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणी
बहुतेक शाळा वर्षांसाठी पालकांकडून जे शुल्क घेतात, त्यामध्ये शाळेत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या शुल्काचाही समावेश असतो. मात्र, तरीही विविध उपक्रमांसाठी शाळेकडून शुल्क घेण्यात येते. सध्या पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये ‘फ्रेशर्स पार्टी’ म्हणजे नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित करण्याचा ट्रेंड आहे. त्यानंतर पालखी सोहळा, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, दहीहंडी अशा सर्व निमित्ताने साजरे करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. साधारण १०० रुपये ते ५०० रुपयांच्या घरात हे शुल्क आहे. काही पूर्वप्राथमिक शाळा या दर महिन्याला ‘थीम पार्टी’ करतात. म्हणजे एखादी कविता किंवा गोष्टीतल्या व्यक्तिरेखेप्रमाणे वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी शाळेत यायचे. शाळाही त्या गोष्टीतील वातावरणाप्रमाणे सजवली जाते. या थीम पार्टीचा भरुदडही पालकांच्या माथी बसतो.

दप्ताराचे ओझे वाढलेच
शाळा नियमित पुस्तकांव्यतिरिक्त इतर अनेक साहित्य आणि उपक्रम पुस्तके बंधनकारक करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे वाढतेच आहे. एकीकडे विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, मात्र शाळांनी शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे.

‘‘कोणत्या दुकानातून कोणती वस्तू खरेदी करावी याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र, अनेक शाळा पालकांना हे स्वातंत्र्य मिळू देत नाहीत. विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्यात येत आहे. शाळा आपले स्वतंत्र साहित्य तयार करत असल्यामुळे आणि ते विशिष्टच दुकानात मिळत असल्यामुळे पालक शाळांच्या दडपशाहीला बळी पडत आहेत.’’
– संदीप चव्हाण, उपाध्यक्ष, फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन