कोथरूड आणि वानवडी येथील शाळेच्या बसवरील मदतनिसाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. शालेय विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, विनयभंग, बलात्कार, शाळेबाहेर होणारी छेडछाड असे गुन्हे घडतात. पण, भीती आणि संकोचामुळे ते सांगण्यास विद्यार्थी पुढे येत नाहीत. म्हणूनच अशा गुन्ह्य़ांवर लक्ष ठेवण्यासाठी परिमंडळ चार मधील १०५ शाळांमध्ये ‘शालेय दक्षता कमिटी’ स्थापना केली आहे. पोलीस, शाळेचे मुख्याध्यापक, एनजीओ आणि पालकांचे प्रतिनिधी या कमिटीमध्ये असणार आहेत.
पुणे पोलिसांच्या परिमंडळ चारच्या हद्दीमध्ये खडकी, विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ, येरवडा, वानवडी, मुंढवा आणि कोंढवा अशी आठ पोलीस ठाणे आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये साधारण १०५ शाळा आहेत. शालेय विद्यार्थ्यांची शिक्षक, कर्मचारी किंवा इतर लोकांकडून होणारा छळ, मुलींची छेडछाड, त्यांना भीती दाखविणे अशा अनेक घटना उघडकीस येत असतात. मात्र, भीतीपोटी विद्यार्थी स्वत:हून समोर येऊन माहिती देण्यास तयार होत नाहीत, किंवा बऱ्याच वेळा पालकांशी याबाबत बोलण्यास घाबरतात. त्यामुळे अशा घटना उघडकीस येत नाहीत. ज्या वेळी या घटना उघडकीस येतात, तेव्हा फारच उशीर झालेला असतो. त्यामुळे आरोपींवर कारवाई करण्यास पोलिसांनाही अडचणी येतात. मुलींच्या विनयभंगाच्या घटना शाळात घडल्या तरी त्या कोणाला सांगत नाहीत.
या गोष्टी मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल असे व्यासपीठ असावे. त्या ठिकाणी विद्यार्थी स्वत: हून घटनेची माहिती देऊ शकतील. या हेतूनेच परिमंडळ चारच्या हद्दीतील शाळांमध्ये पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी शालेय दक्षता कमिटी स्थापन केली आहे. या समितीमध्ये पोलिसांचा समावेश असल्यामुळे त्यांनाही नेमकी आणि तत्काळ घटनेची माहिती मिळून कारवाई करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर शाळा आणि पोलीस यांचा समन्वय असल्यामुळे अशा घटना रोखता येतील. सुरुवातीला फक्त येरवडा पोलीस ठाण्यात पूर्वी अशी दक्षता कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीने आलेल्या तक्रारी सोडविण्याचे काम चांगले केले होते. मात्र, ते पोलीस निरीक्षक बदलून गेल्यानंतर ही कमिटी बंद झाली होती. मात्र, आता पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या हद्दतील आठ पोलीस ठाण्यात ही समिती स्थापन केली आहे. ज्या विद्यार्थ्यांसोबत वाईट प्रसंग घडले आहेत. त्यांच्याशी सुसंवाद साधणे, त्यांना बोलते करून संपर्कात राहणे. त्याच्या अडचणी समजावून घेण्याचे काम समिती करेल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.