विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार शहरातील एकही रिक्षा पात्र ठरलेली नाही. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्वच रिक्षा बेकायदेशीर असल्याची धक्कादायक माहिती, प्रादेशिक परिवाहन अधिकारी अरुण येवला यांनी मंगळवारी दिली.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वारंवार केले आहे. त्यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबविणार आहे. हे औचित्य साधून झालेल्या पत्रकार परिषदेत अरुण येवला यांनी ही माहिती दिली. वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे या प्रसंगी उपस्थित होते.
तीन ते बारा वर्षे वयोगटातील केवळ चार मुलांना एका रिक्षातून नेण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याची परवानगी देता येणार नाही. त्यामुळे पालकांनी रिक्षा सुरू करण्यापूर्वी त्या रिक्षातून किती विद्यार्थ्यांची वाहतूक होणार आहे याची माहिती घेणे गरजेचे असल्याचेही अरुण येवला यांनी सांगितले. विद्यार्थी वाहतुकीसाठी फायबर हुड असलेल्या रिक्षा सुरक्षित आहेत. मात्र, तशी एकही रिक्षा शहरामध्ये आढळून आली नाही. कापडी हूड असलेल्या रिक्षांना विद्यार्थी वाहतुकीची परवानगी नाही. विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी २५० शाळांमध्ये समितीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये ही समिती अस्तित्वात नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही. ती जबाबदारी शिक्षण विभागाची असल्याचेही येवला यांनी स्पष्ट केले.
‘रस्त्यावर थांबण्यास मनाई’
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शाळांमध्ये पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, ही शाळांची जबाबदारी आहे. ज्या शाळांची मैदाने आहेत त्यांनी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केले. रस्त्यांवर थांबणाऱ्या रिक्षा आणि स्कूलबसवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 2:40 am