बालनाटय़ातून मुलांचा सर्वागीण विकास होतो. शालेय वयातच त्यांना नाटकाच्या माध्यमातून स्वत:चा शोध घेता येतो. बालनाटय़ाची चळवळ अडगळीत पडली असून शाळांनाच मुलांच्या बालपणाचा विसर पडतोय, अशा शब्दांत ‘पृथ्वी थिएटर्स’च्या संचालक आणि अभिनेत्री संजना कपूर यांनी खंत व्यक्त केली. शाळांमध्ये आता केवळ वार्षिक स्नेहसंमेलनापुरतीच बालनाटय़ होतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेतर्फे आयोजित बालनाटय़ संमेलनाचे उद्घाटन संजना कपूर यांच्या हस्ते झाले. नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे, बालकलाकार अथर्व कर्वे, शाखाध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, दादा पासलकर, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, शुभांगी दामले, नाटय़संस्कार कला अकादमीचे प्रकाश पारखी, ज्येष्ठ नाटय़समीक्षक माधव वझे आणि उदय लागू या वेळी उपस्थित होते.
बालनाटय़ संमेलन या संकल्पनेची प्रशंसा करून संजना कपूर म्हणाल्या, शाळांनी मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. मात्र, अभ्यास आणि निकालाची गुणवत्ता यालाच प्राधान्य देण्यामध्ये गुंतलेल्या शाळांना मुलांच्या बालपणाचा विसर पडला आहे. शाळांतून केवळ स्नेहसंमेलनातून होणारे बालनाटय़ांचे सादरीकरण ही धक्कादायक बाब आहे. रंगमंचावर मुलांचा सर्वागीण विकास होतो. नाटकांतून सर्जनशील अनुभव मिळत असल्याने मुलांनी नाटक पाहणे आणि त्यामध्ये भूमिका साकारणे गरजेचे आहे. बालनाटय़ांसाठी स्वतंत्र नाटय़गृहे उभारण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनेही (एनसीईआरटी) बालनाटय़ या विषयाचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमामध्ये केला पाहिजे.
बालरंगभूमी हाच उद्याच्या नाटय़चळवळीचा मूलाधार आहे. बालनाटय़ातून केवळ कलाकारच नाही तर, प्रेक्षकही घडण्यास मदत होते. त्यामुळे बालरंगभूमी जगविणे आवश्यक असल्याचे मत अरुण काकडे यांनी व्यक्त केले. कलाकार म्हणून घडण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासामध्ये बालनाटय़ चळवळीचे योगदान असल्याचे अथर्व कर्वे याने सांगितले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. दादा पासलकर यांनी आभार मानले.