विद्यार्थी वयातच श्रमाचे महत्त्व कळावे, विक्री कौशल्याची ओळख व्हावी या उद्देशाने शाळांमध्ये ‘खरी कमाई’ ची संकल्पना राबवली जात असे. पुण्यातील काही नामवंत शाळांनी मात्र या खऱ्या कमाईच्या उपक्रमाचा वेगळाच अर्थ काढून विद्यार्थ्यांना चक्क लॉटरीची तिकिटेच विकायला लावली आहेत. शाळांच्या या उपक्रमातून शिक्षकही सुटलेले नाहीत.
यापूर्वी दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये विद्यार्थ्यांना वस्तूंची विक्री करण्याच्या कौशल्याची ओळख व्हावी, स्वत: कमावण्यातील महत्त्व कळावे म्हणून शाळा विविध उपक्रम राबवत असत. दिवाळीचे साहित्य, आपल्याच शाळेत तयार करण्यात आलेल्या शोभेच्या वस्तू, एखाद्या सामाजिक संस्थेने तयार केलेल्या वस्तू घरोघरी जाऊन विकण्याचा अभ्यासच शाळा देत असत. यातून मिळालेला निधी दान करण्यात येत असे. शाळांमध्ये पूर्वीपासून चालत आलेली ही पद्धत काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी अवलंबली आहे. मात्र फरक इतकाच की या शाळांनी कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने केलेल्या वस्तूंऐवजी विद्यार्थ्यांना चक्क लॉटरीच विकायला लावली आहे. या शाळांतील विद्यार्थीच नाही, तर शिक्षकही शाळेच्या ‘खऱ्या कमाई’तून सुटलेले नाहीत.
अशाच एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन लॉटरीची ही तिकिटे विकली. शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करून त्या माध्यमातून या तिकिटांची सोडतही झाली. लॅपटॉप, मोबाईल अशा किमती वस्तूंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. दहा रुपयांच्या या तिकिटांची पुस्तकेच विद्यार्थ्यांना देण्यात आली. शेजारी, ओळखीच्यांकडे जाऊन ही तिकिटे विकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या, अशी माहिती या शाळेतील एका पालकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.’ त्यांनी सांगितले, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या मुलीला या सोडत तिकिटांचे पुस्तक देण्यात आले. हे पुस्तक संपलेच पाहिजे अशी सूचना शाळेतून देण्यात आली होती. शाळेतील सर्वच मुलांना ही तिकिटे विकण्याची सूचना देण्यात आली होती. साधारण २० ते ३० तिकिटे विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातून गोळा झालेल्या निधीचे काय करणार याबाबतही काहीच माहिती देण्यात आली नाही. शाळेच्या संमेलनात या तिकिटांची सोडत झाली. यासाठी साहाय्य करणाऱ्या कंपन्यांचे स्टॉल्स या कार्यक्रमात होते.’
कंपन्यांची जाहिरातबाजी स्नेहसंमेलनातून
शाळांची स्नेहसंमेलने, आनंदमेळा अशा ठिकाणी आपल्या वस्तूंच्या जाहिरातबाजीसाठी कंपन्या स्टॉल्स उभे करतात. या कंपन्यांना एका ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर ग्राहकवर्ग मिळू शकतो. त्यामुळे लॉटरीची तिकिटे, त्याच्या सोडतीसाठी कार्यक्रम अशा गोष्टींचा खर्च या कंपन्यांकडून करण्यात येतो किंवा शाळेच्या संमेलनाला निधी दिला जातो.