शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा प्रवेशात आरक्षित असलेल्या पंचवीस टक्के जागांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असली, तरीही अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रवेश द्यायचा की नाही, हे ठरवण्याचे अधिकार शाळांनाच राहणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १२ हजार जागा आरक्षित आहेत.
शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या पंचवीस टक्के जागांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या आरक्षित जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. या पाश्र्वभूमीवर या वर्षी मुंबई आणि पुण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असली, तरी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांला प्रवेश देण्याचे अधिकार हे शाळांकडेच राहणार आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्हच आहे.
एमकेसीएलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या वर्षी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि दक्षिण मुंबई या भागातील इच्छुक शाळांमध्येच ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल, असे राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. चोक्कलिंगम म्हणाले, ‘‘पंचवीस टक्क्य़ांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी. त्याचप्रमाणे पालक आणि शाळा दोघांसाठीही सोयीचे व्हावे म्हणून ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी शासनाने प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे अधिकार हे शाळांनाच राहतील; मात्र शाळांनी नियमानुसार आणि ठरवून दिलेल्या निकषांनुसार प्रवेश देणे आवश्यक आहे. या वर्षी ही प्रक्रिया उशिरा सुरू होत असल्यामुळे ज्या शाळांनी प्रवेश केले आहेत किंवा प्रक्रिया सुरू आहे अशा शाळांना त्यांच्या पद्धतीनुसार प्रक्रिया राबवण्याची मुभा आहे. या वर्षीच्या अनुभवानुसार आवश्यक ते बदल करून पुढील वर्षी अधिक चांगल्याप्रकारे या पद्धतीची अंमलबजावणी होऊ शकेल. या महिना अखेपर्यंत प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू होईल’’
 या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये साधारण पाचशे शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून १२ हजार प्रवेश क्षमता आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिला.