X

विज्ञानप्रेमींच्या दातृत्वामुळे ‘सृष्टिज्ञान’ ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हाती जाणार

‘सृष्टिज्ञान’चे मुख्य संपादक म्हणून राजीव विळेकर तर कार्यकारी संपादक म्हणून कविता भालेराव काम पाहतात.

शास्त्रीय ज्ञानाचा सोप्या मराठीत प्रसार करण्याचे काम गेली ८९ वर्षे करत असलेल्या ‘सृष्टिज्ञान’ मासिकाने आता ग्रामीण शाळांमधील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना या मासिकाचा लाभ देण्याची योजना आखली आहे. या योजनेत जिज्ञासू विद्यार्थी व शाळांना ‘सृष्टिज्ञान’ मासिकाचे अंक नि:शुल्क दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण शाळांना मासिकाचे अंक विनामूल्य देण्यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी पुण्यातील काही विज्ञानप्रेमींनी उत्स्फूर्तपणे दाखवल्यामुळे ही योजना साकारणे संस्थेला शक्य होत आहे.

‘शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करणारे मराठीतील आद्य मासिक’ अशी ओळख असलेल्या ‘सृष्टिज्ञान’चा प्रारंभ १९२८ मध्ये झाला. प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे, डॉ. दि. धों. कर्वे, स. बा. हुदलीकर ही मंडळी त्यात अग्रेसर होती. ब्रिटिश राजवटीच्या त्या काळात विज्ञानविषयक माहिती मराठीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा मासिक सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता. मासिकाचा पहिला अंक १ जानेवारी १९२८ रोजी मुंबईत प्रसिद्ध झाला. पुढे १९३३ मध्ये पुण्यातील ‘आर्यभूषण’ मुद्रणालयाचे वामनराव पटवर्धन यांनी ‘सृष्टिज्ञान’ची जबाबदारी स्वीकारली. समाजसेवेच्या तळमळीतून आर्यभूषण प्रेसमधून ‘सृष्टिज्ञान’ ४२ वर्षे प्रकाशित झाले. मासिकाने पाचशेव्या अंकापर्यंतचा टप्पा तेव्हा गाठला होता. डिसेंबर १९७४ मध्ये हा प्रेस बंद पडला आणि ‘सृष्टिज्ञान’ चालवण्याची तयारी महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाने दर्शवली. तेव्हापासून आतापर्यंत मासिकाची जबाबदारी संग्रहालयाने घेतली आहे. जुलै २०११ मध्ये मासिकाचा एक हजारावा अंक प्रकाशित झाला आणि संपादकीय मंडळातील पाचवी पिढी या अंकाची जबाबदारी सध्या समर्थपणे सांभाळत आहे.

‘सृष्टिज्ञान’सारखे दर्जेदार मासिक ग्रामीण भागातील शाळांपर्यंत आणि विज्ञानाची आवड असणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवे या तळमळीतून पुण्यातील काही मंडळी पुढे आली आहेत. ग्रामीण भागातील ज्या माध्यमिक शाळांना ‘सृष्टिज्ञान’ हवे असेल त्या शाळांनी व्यवस्थापकांकडे (‘सृष्टिज्ञान’, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, १२०३ घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४, संपर्क ०२०- २५५३२७५० किंवा ९९२२५०८३६३) संपर्क साधल्यास अशा शाळांना हे मासिक वर्षभर विनामूल्य पाठवण्याची योजना ‘सृष्टिज्ञान’ने आखली आहे. काही देणगीदारांनी या योजनेसाठी देणगी दिली असून त्यामुळे ही योजना साकारणार आहे. आणखी देणगीदार पुढे आल्यास शाळांची संख्या वाढवण्याचीही योजना असल्याचे मासिकाच्या कार्यकारी संपादक कविता भालेराव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘सृष्टिज्ञान’चे मुख्य संपादक म्हणून राजीव विळेकर तर कार्यकारी संपादक म्हणून कविता भालेराव काम पाहतात. संपादक मंडळात डॉ. क. कृ. क्षीरसागर, स. वि. पाडळीकर, प्रा. जयंत खेडकर, रमेश दाते, डॉ. रघुराज घोलप ही मंडळी काम करतात. ज्या निरलस व निरपेक्षपणे आणि सेवाभावी वृत्तीने हे मासिक सुरू झाले आणि चालवले गेले त्याच वृत्तीने सध्याचेही संपादक मंडळ हे मासिक चालवत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांचेही गेली अनेक वर्षे या मासिकाला साहाय्य लाभत आहे. विज्ञानाशी संबंधित शेकडो इंग्रजी शब्दांचे बोली भाषेजवळ नेणारे पारिभाषिक शब्द मराठीत आणण्याचे तसेच विज्ञानाशी संबंधित अनेकविध विषय सोप्या मराठीतून वाचकांसमोर सातत्याने मांडण्याचे काम ‘सृष्टिज्ञान’ने केले आहे.